प्रभात वृत्तसेवा पिंपरी, दि. 29 (प्रतिनिधी) –पिंपरी-चिंचवड येथील महासाधू श्रीमोरया गोसावी समाधी मंदिरातून निघणाऱ्या द्वारयात्रेला उत्साह आणि भक्तिमय वातावरणात शुक्रवारपासून प्रारंभ झाला, अशी माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्ट चे मुख्य विश्वस्त श्री मंदार देव महाराज यांनी दिली.
द्वारयात्रेच्या पहिल्या दिवशी सकाळी साडेआठ वाजता मंगलमूर्तींची विधीवत पूजा करून त्यांना दुर्वा वाहण्यात आल्या. त्यानंतर चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी संजीवन समाधीचे दर्शन घेऊन द्वारयात्रा पुर्वद्वार-श्री मांजराई देवी मंदिराकडे वाजतगाजत मार्गस्थ झाली, त्यावेळी यात्रेत 150 भाविक सहभागी झाले. एम्पायर इस्टेट येथील मांजराई देवी सेवा प्रतिष्ठानच्या वतीने संजय साळवी व अन्य विश्वस्तांनी यांनी द्वारयात्रेचे स्वागत केले. यानंतर श्री मांजराई देवी मंदिरात देवीचे पूजन करून गोंधळ, जोगवा असे धार्मिक विधी परंपरेप्रमाणे करण्यात आले. त्यानंतर चिंचवड येथे येऊन श्रीचिंतामणी समाधी मंदिरासमोर धुपारती म्हणण्यात आली. श्री मंगलमूर्ती वाड्यात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.30) दक्षिणद्वार असलेल्या वाकड येथील आसराई देवी मंदिर, तिसऱ्या दिवशी रविावरी (दि.31) पश्चिमद्वार असलेल्या रावेत येथील ओझराई देवी मंदिर आणि चौथ्या दिवशी सोमवारी दि.1 ऑगस्टला उत्तरद्वार असलेल्या आकुर्डी येथील मुक्ताई देवी मंदिरात यात्रा दर्शनासाठी जाणार आहे.