मायणी -मायणीतील करोना रुग्णांसाठी मातोश्री सरुताई ट्रस्ट, मेडिकल असोसिएशन व यशश्री महिला बचत गट यांनी ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्याचे पाऊल उचलले होते. गावापासून दूर असलेल्या सद्गुरू सरुताई मठात या सुविधेचे लोकार्पण प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या उपस्थितीत नुकतेच झाले.
त्यावेळी हे सेंटर मठात न ठेवता प्राथमिक आरोग्य केंद्राकडे वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता; परंतु दोनच दिवसातच ऑक्सिजन बेडचे साहित्य प्राथमिक आरोग्य केंद्रात न ठेवता, ते लोकवस्तीत आरोग्य केंद्राला लागून असलेल्या पशुसंवर्धन दवाखान्यात आणून ठेवल्याने लोकांनी त्यास कडाडून विरोध केला आहे.
उद्घाटन एकीकडे आणि ऑक्सिजन बेडची सुविधा दुसरीकडे झाल्याने मायणी, इंदिरानगर येथील ग्रामस्थ संतप्त झाले. पशुसंवर्धन दवाखाना इंदिरानगरात असून येथील नागरिक काबाडकष्ट करून जीवन जगणारे आहेत. त्यांना करोनाची बाधा झाली तर त्यावरील उपचारांचा खर्च परवडणार नाही. त्यामुळे पशुसंवर्धन दवाखान्यात ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे.
प्रांताधिकारी व तहसीलदारांनी हा निर्णय रद्द करून, त्या बेडची व्यवस्था मायणी करोना केअर सेंटरमध्येच करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.