मुंबई – बेस्ट बस आणि लोकल यांना मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. त्या नसा असतील तर मुंबईतील डबेवाले रक्त आहेत. तसेच मुंबईचे डबेवाले शक्ती आणि भक्तीचे प्रतीक आहेत, अशा शब्दात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील डबेवाल्यांच्या कार्याचे कौतुक केले.
मुंबईतील बांद्रा (पश्चिम) येथील “डबेवाला भवन’चे उद्घाटन आदित्य ठाकरे तसेच महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबईकरांना वेळेवर जेवण पोहोचवण्याचे काम ते अखंडपणे करीत असल्याने मुंबईकरांचा त्यांच्यावर विश्वास आहे. मुंबई कधी थांबत नाही आणि मुंबई चालवणाऱ्या घटकांमध्ये डबेवाल्यांचा समावेश आहे.
कोविडच्या काळातही विविध प्रकारे त्यांनी मुंबईकरांची सेवा केल्याचे सांगून आज विविध ऑनलाईन सेवा देणाऱ्या संस्था अस्तित्वात आल्या असतानाही डबेवाल्यांच्या स्वतःच्या व्यवस्थापन कौशल्यामुळे ते कुठेही मागे पडणार नाहीत, याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.