बेशिस्त वाहनचालकांना तीन महिन्यांत 58 लाखांचा दंड

पिंपरी (प्रतिनिधी) – नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांना वाहतूक पोलीस ऑनलाइन चलन पाठवितात. बहुतांश वाहन चालक वेळेत स्वतःहून दंड भरत नाहीत. यामुळे हा दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली आहे. शहरातील बेशिस्त वाहनचालकांमुळे सरकारी तिजोरीत कोट्यवधी रुपयांची भर पडत आहे. गेल्या केवळ तीन महिन्यांमध्ये पोलिसांनी विशेष मोहीम राबवित तब्बल 58 लाखांचा दंड वसूल केला आहे.

टाळाटाळ करणाऱ्यांकडून वसूल केला दंड

दंडाच्या नावाखाली वाहतूक पोलीस चिरीमिरी घेतात, असा आरोप नेहमीच होत असे. पोलिसांवरील हा डाग पुसण्यासाठी शासनाने रोख स्वरूपात दंड घेऊ नये, असे आदेश काढले आहेत. यासाठी शासनाने पोलिसांना स्वाईप मशिन उपलब्ध करून दिल्या.

आता वाहतूक पोलीस फक्‍त डेबिट आणि क्रेडीट कार्डद्वारे दंड स्विकारत आहेत. जर रोखीने दंड भरायचा असेल तर तो व्होडाफोनच्या गॅलरीमध्ये जाऊन भरावा लागतो. तसेच एखाद्या वाहन चालकाने नियमभंग केल्यास त्यांच्या पोलीस मोबाईलवर चलन पाठवितात. वाहन चालक जागेवर नसेल तर त्या वाहन क्रमांकाच्या नावे दंड दिसून येतो. पुढीलवेळी वाहन पकडल्यास मागील किती दंड भरणे शिल्लक आहे, याची माहिती वाहतूक पोलीस वाहन चालकाला देऊन दंड भरण्यास सांगतात. मात्र तरीही अनेक वाहन चालक स्वतःहून दंड भरत नाहीत.

वाहन चालकांकडील दंड वसूल करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिम आखली आहे. आठवड्यातून तीन दिवस प्रत्येक वाहतूक पोलीस शाखेकडून नाकाबंदी केली जाते. या नाकाबंदीमध्ये वाहन तपासणी केली जाते. ज्या वाहनावर दंड आहे तो दंड पोलीस वसूल करतात. पिंपरी चिंचवड शहरात आगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्‍टोबर महिन्यात अशा प्रकारे विशेष मोहीम राबवत तब्बल 58 लाखांचा दंड वाहतूक पोलिसांनी वसूल केला.

वाहन चालकांनी नियमांचे पालन करावे. नियमभंग केल्यास वाहतूक पोलीस दंड आकारणी करतात. याबाबत संबंधित पोलीस वाहन चालकाच्या मोबाईलवर एसएमएस पाठवितात. कोणत्याही शहरात दंड भरण्याची सुविधा शासनाने वाहन चालकांना उपलब्ध करून दिली आहे. जर आपल्या वाहनावर पोलिसांनी दंड आकारणी केली असेल तर वाहन चालकांनी लवकरात लवकर दंड भरावा.
– प्रसाद गोकुळे, वाहतूक पोलीस निरीक्षक-नियोजन शाखा

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)