सरपंचांच्या घरासमोर रस्त्यावर खड्डेच खड्डे

शिक्रापूर येथील तळेगाव ढमढेरे रस्त्यावरील अवस्था

खड्ड्यांच्या शेजारीच नामफलक

शिरूर तालुक्‍यातील शिक्रापूर हे सर्वांत मोठे गाव असून या गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांच्या घरासमोरच भलेमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांच्या शेजारी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या “निवासाकडे’ असे फलक लावलेले आहेत. याच रस्त्याने दररोज हे सगळे जातात, त्यामुळे त्या फलकांकडे, पाहून नागरिक आश्‍चर्य व्यक्त करीत आहेत. या खड्ड्यांना कोणी वाली आहे का, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे.

शिक्रापूर – येथील शिक्रापूर-तळेगाव ढमढेरे या रस्त्यालगतच शिक्रापूरच्या सरपंच राहत असून सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांसह या भागातील नागरिक त्रस्त झाले असून, हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे शिक्रापूर येथील चाकण चौक ते तळेगाव ढमढेरे गावापर्यंत रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून स्थानिक पुढारी, प्रशासन रस्ता दुरुस्तीसाठी बेफिकीर आहेत. हा रस्ता शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे या दोन मोठ्या गावांना जोडणारा असून पुढे न्हावरे, केडगाव, चौफुला व सोलापूर महामार्गाला मिळत असल्याने या रस्त्यावर वाहनांची सतत वर्दळ असते.

या रस्त्याच्या कडेला लहान-मोठ्या वाड्या-वस्त्या व नव्याने झालेल्या सोसायट्या, शाळा, बॅंका आहेत. शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे या दोन्ही गावांतील महत्त्वाची शासकीय कार्यालये, ग्रामीण आरोग्य रुग्णालये, शाळा, महाविद्यालये, बॅंक आदी सुविधा आहेत. त्यामुळे दररोज आसपासच्या अनेक गावांतील नागरिकांची या रस्त्यावर वर्दळ असते. या रस्त्याने वाहनचालकांना, विद्यार्थ्यांना कसरत करीत वाहन चालवावे लागते. वयोवृद्धांना या रस्त्याने सध्या चालता देखील येत नाही. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती केव्हा होणार याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. बसस्थानक परिसरात पडलेले खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीचालक या खड्ड्यांमध्ये पडत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.