थेऊरगाव मार्गाची वहिवाट बिकट

अधिकाऱ्यांचा संपर्क होऊ शकला नाही

थेऊर- कोलवडी गावाला जोडणाऱ्या मुळा मुठा नदीवरील पुलाच्या रस्त्यावर खड्ड्यांमुळे वाहनांची कोंडी होत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याची भावना नागरिकांतून उमटत आहे. पुलावरील कोलवडी गावाच्या दिशेने भरावालाही खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभाग अभियंता अधिकाऱ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

थेऊर – हवेली तालुक्‍यातील थेऊरगांव ते थेऊरफाटा या रस्त्यावर सुमारे एक ते दीड फुटांचे खड्डे पडल्याने सुमारे ,पाच किलोमीटर रस्त्याची चाळण झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने या रस्त्याची वहिवाट बिकट झाली आहे. साईडपट्टयाही खचल्याने रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी करूनही याकडे अधिकारी डोळेझाक करीत असल्याचा आरोप हवेली तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस लक्ष्मण चव्हाण व चिंतामणी प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष पुरुषोत्तम कुंजीर यांनी केला. या रस्त्याची डागडुजी सार्वजनिक बांधकाम विभागाने न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

पुणे सोलापूर महामार्गावरून थेऊर-कोलवडीमार्गे पुणे-नगर महामार्गाकडे जाण्यासाठी हा नजीकचा रस्ता आहे. नगर रस्त्यावर लोणीकंद, कोरेगाव-भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, रांजणगाव, कोरेगाव परिसरात औद्योगिक कंपन्या असल्याने जड वाहतुकीसाठी या रस्त्याचा वापर होतो. अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणीचे मंदिर थेऊर येथे आहे.

याठिकाणी वर्षभर भाविक व पर्यटकांची गर्दी असते. बांधकाम विभाग व तत्कालीन आमदार अशोक पवार यांच्या प्रयत्नातून रस्त्याचे काम काही वर्षापूर्वी झाले होते. काही ठिकाणी साकव तयार केले आहेत. मात्र, त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा साईडपट्ट्या मजबूत केल्या नसल्यामुळे त्या पुन्हा खचल्या आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.