नगर -शहरातील गणेश विसर्जन मार्गाची झालेली दुरवस्था, शहरातील साफसफाई व नालेसफाईकडे प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष यांसह अन्य महत्वाच्या मुद्द्यांवर स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. शहरातील महत्वाच्या प्रश्नांवर सदस्यांनी अधिकाऱ्यांना सभेत जाब विचारला. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
महापालिकेच्या स्थायी समितीची सभा मंगळवारी सभापती कुमार वाकळे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. सभेच्या सुरुवातीला नूतन आयुक्त डॉ. पंकज जावळे यांचा सदस्यांनी सत्कार केला. त्यानंतर सभेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या कराराची मुदत संपत आलेली आहे. त्यामुळे ठेकेदाराकडून कचरा संकलन व्यवस्थित केले जाणार नाही.
ठेकेदाराचे वजनकाटे तपासावेत, अशी सूचना सभापती वाकळे यांनी केली. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. मोकाट कुत्र्यांकडून हा कचरा रस्त्यावर आणला जात आहे. त्यामुळे शहर व उपनगरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, असा आरोप वाकळे यांनी केला. कचरा संकलनाचा नवीन प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे घनकचरा विभागप्रमुख डॉ. शेडाळे यांनी सांगितले. शहरातील साफसफाई व नालेसफाईबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी सदस्यांनी केली.