एसटीचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

तीन टक्‍के महागाई भत्ता तातडीने लागू करावा; विविध संघटनांची मागणी

पुणे – राज्य महामार्ग परिवहन महामंडळातील (एस.टी) कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे आणि राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे तीन टक्‍के महागाई भत्ता तातडीने लागू करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य वाहतूक कामगार संघटनेने केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास 25 ऑक्‍टोबरला राज्यातील सर्व विभागीय कार्यालय व मध्यवर्ती कार्यालयांसमोर धरणे धरण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

राज्य सरकारच्या तरतुदीनुसार एस.टी कर्मचाऱ्यांना जुलै 2019 च्या वेतनापासून वाढीव तीन टक्‍के महागाई भत्ता लागू करण्याचे निश्‍चित केले होते. मात्र, अद्यापही वाढीव भत्ता लागू करण्यात आला नाही. हा भत्ता महागाईसह दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना देण्यात यावा, अशी मुख्य मागणी संघटनेची आहे.

दरवर्षी कर्मचाऱ्यांना सानुग्रह दिवाळीपूर्वी कर्मचाऱ्यांना वाटप केला जातो. मात्र, यंदा दिवाळी तोंडावर येऊन ठेपली तरी सानुग्रह देण्यात आला नाही. त्यामुळे एस. टी कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे. तसेच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सणांपूर्वी उचल देण्याचे कामगार करारान्वये मान्य करण्यात आले होते. त्यानुसार एस.टी महामंडळाने तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना साडेबारा हजार रुपये उचल द्यावी व ऑक्‍टोबर महिन्याचे वेतन 25 तारखेपर्यंत जमा करावे, अशा विविध मागण्या संघटनेने महामंडाकडे केलेल्या आहेत. या मागण्या दिवाळीपर्यंत पूर्ण कराव्यात ; अन्यथा आंदोलन करण्यात यईल, असा इशारा संघटनेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

राज्य सरकारकडून टाळाटाळ
राज्य सरकार आचारसंहितेचे कारण सांगून कर्मचाऱ्यांच्या मागण्या फेटाळून लावत आहे. दिवाळी सण कर्मचाऱ्यांनाही आनंदात जाण्यासाठी सरकारने मागण्या मान्य करण्याची आवश्‍यकता आहे. दिवाळीपूर्वी मागण्या मान्य न केल्यास राज्यातील सर्व मध्यवर्ती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत, असे महाराष्ट्र राज्य वाहतूक कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.