सातव्या टप्प्यामध्ये सरासरी 61 टक्‍के मतदान

नवी दिल्ली- लोकसभा निवडणूकीच्या सातव्या टप्प्यासाठी आज झालेल्या मतदानादरम्यान 61 टक्के मतदान झाले. या टप्प्यामध्ये पंजाब आणि उत्तर प्रदेशातील 13, पश्‍चिम बंगालमधील 9, बिहार आणि मध्यप्रदेशातील 8, हिमाचल प्रदेशातील 4, झारखंडमधील 3 आणि चंदिगडमधील एका अशा एकूण 59 जागांसाठी मतदान झाले. या टप्प्प्यासाठी 918 उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही समावेश होता.

उत्तर प्रदेशात 55.52 टक्के मतदानाची नोंद झाली. तर पंजाबमध्ये 59 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या वाराणसी मतदारसंघामध्ये 53 टक्के मतदान झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पंजाब आणि हरियाणाची संयुक्‍त राजधानी असलेल्या चंदिगढ या एकाच जागेसाठी 63.57 टक्के मतदान झाले. पतियाळा येथे सर्वाधिक 64 तर अमृतसर येथे सर्वात कमी 52 टक्के मतदान झाले.

हिमाचल प्रदेशातल्या 4 जागांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 66.70 टक्के मतदान झाले होते. “ईव्हीएम’मधील तांत्रिक बिघाडामुळे येथील 9 मतदान केंद्रांमधील मतदानाचा कालावधी वाढवण्यात आला होता. देशातील सर्वात उंचीअरील लहाउल आणि स्पिती येथील मतदान केंद्रांवर समाधानकारक मतदान झाले.

मध्यप्रदेशात 69 टक्के मतदान झाले. मात्र अगर माळवा जिल्ह्यातल्या देवास येथील मतदारांनी आणि मंडसौर जागेसाठीच्या 5 मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. मतदान अधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर देवासमध्ये केवळ 12 मतदारांनी मतदान केले.

बिहारमध्ये सातव्या टप्प्यातील सर्वात कमी 53.36 टक्के मतदानाची नोंद झाली. तर शेजारील झारखंडमध्ये 70 टक्के मतदान झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.