जळोची (वार्ताहर) – बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कामकाज शासकीय वेळेत सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी चालू होत नसल्याने बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात बारामती, दौंड, इंदापूर या तीन तालुक्यांतून जवळपास 70 ते 80 किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या वाहन मालक, चालकांची ससेहोलपट होत आहे. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज शासकीय वेळेत सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
राज्याचे परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विना हेल्मेट दुचाकी वाहन धारकांवर दंडात्मक कारवाई होणार असून ही बाब स्वागतार्ह आहे. या उलट मात्र राज्यपाल यांच्या अध्यादेशानुसार बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील काही कर्मचारी व अधिकारी सकाळी 9 वाजुन 45 मिनीटांनी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. राज्यपालांच्या अध्यादेशानुसार व शासकीय नियमानुसार परिवहन अधिकारी यांनी कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांची उपस्थिती दररोज सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी तपासून प्रत्यक्ष कामकाज शासकीय वेळेत 9 वाजून 55 मिनीटांनी सुरु करणे कायद्याने बंधनकारक आहे.
कार्यालयातील कक्ष, विभागामध्ये प्रवेश फक्त कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त अनधिकृत खागी व्यक्ती यांचा वावर होता कामा नये, असे लेखी आदेश असूनही बारामती परिवहन कार्यालयात सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने सुरू नसल्याचा गैरफायदा घेऊन अनधिकृत, खासगी व्यक्ती कार्यालयात प्रवेश करीत आहे. या घुसखोरी करणाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
बारामती परिवहन कार्यालयात कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेळेत उपस्थितीबाबत आमच्याशी संपर्क साधावा. खासगी अनधिकृत व्यक्ती कार्यालयाच्या आत घुसतात, याची चौकशी केली जाईल.
– नंदकिशोर पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बारामती.