ब्रुसेल्स – फिनलंड आणि स्वीडन हे देश देखील नाटोमध्ये सहभागी होऊ शकतील, असे नाटोचे सरचिटणीस जीन स्टॉलेनबर्ग यांनी म्हटले आहे. जर या देशांनी नाटोमध्ये सहभागी होण्याचा विचार केला, तर त्यांचे स्वागतच केले जाईल. हे त्वरित देश नाटोचे सदस्य बनू शकतात, असे ते म्हणाले. रशियाने युक्रेनविरोधात सुरू केलेल्या युद्धाच्या पार्श्वभुमीवर फिनलंड आणि स्वीडन या देशांना “नाटो’चे सदस्य बनण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळू लागला आहे. आता मे महिन्याच्या मद्यापर्यंत हे दोन्ही देश नाटोच्या सदस्यत्वासाठी अर्ज करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येऊ लागली आहे.
नाटोमध्ये सहभागी होण्याबाबतचा निर्णय या देशांचाच असेल. मात्र जर या देसांनी सदस्यत्वासाठी अर्ज केला तर ती प्रक्रिया त्वरित पार पाडली जाऊ शकेल, असे स्टॉलबर्ग यांनी म्हटले आहे. या देशांनी सदस्यत्वासाठी अर्ज केल्यापासून ते त्यांना प्रत्यक्ष सदस्यत्व मिळेपर्यंतच्या काळात त्यांना रशियाकडून धमकावले जाऊ शकते. तो अंतरिम कालावधी अशा प्रकारे पूर्ण करण्याचे मार्ग आहेत फिनलंड आणि स्वीडन दोन्हीसाठी पुरेसे चांगले आहेत, असेही ते म्हणाले. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायजेशन अर्थात नाटोच्या सदस्य देशांच्या संरक्षणाची हमी या संघटनेकडून दिली जाते. नाटोने आतापर्यंत युक्रेनला 8 अब्ज डॉलरचे लष्करी सहाय्य उपलब्ध करून दिले आहे.