पंतप्रधानांचे भाजप खासदारांना मार्गदर्शन
नवी दिल्ली- भाजप हे मूळ संघटनेत आहे. कृत्रिम एकत्रिकरण नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भाजपच्या खासदारांना सांगितले. खासदार किंवा मंत्री झाल्यानंतरही पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते म्हणूनच सक्रिय रहावे, असे आवाहनही पंतप्रधानांनी केले. “भाजपचे अस्तित्व मूळ संघटनेमध्ये आहे. एखाद्या कुटुंबाचा वारसा म्हणून नव्हे, तर विचारधारेच्या आधारे भाजपने येथपर्यंत मजल मारली आहे.’ असे मोदी म्हणाले. भाजप खासदारांसाठी आयोजित दोन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळे दरम्यान ते बोलत होते.
खासदार किंवा मंत्री झाल्यानंतरही आपल्यातील पक्ष कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे. आपले वय जरी वाढले तरी आपल्यातील विद्यार्थीदश कायम राहिली तर आपली शिकण्याची वृत्तीही कायम राहते, असे पंतप्रधानांनी सांगितले, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली. या दोन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला आजपासून सुरुवात झाली.
या दोन दिवसांच्या प्रशिक्षण कार्यशाळेदरम्यान गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचेही मार्गदर्शन पक्षाच्या खासदारांना होणार आहे. “अभ्यास वर्ग’ या नावाने परिचित या प्रशिक्षण कार्यशाळेदरम्यान पक्षाची विचारधारा आणि संसदीय कार्यपद्धती आदी विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले जाणार आहे.