New Year : सरत्या वर्षांला निरोप देताना आणि नवीन वर्षांचे स्वागतासाठी नागरिकांनी जय्यत तयारी केली आहे. या पाश्र्वभूमीवर शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मुंबई पोलीसही सज्ज झाले आहेत.
शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून मुंबई पोलिसांच्या मदतीला वाहतूक पोलीस, सशस्त्र दल, दंगल नियंत्रण पथक, गुन्हे शाखा, बीडीडीएस विशेष पथक, राज्य राखीव दल आणि जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहे.
मुंबईत 22 पोलीस उपायुक्त, 45 सहाय्यक पोलीस आयुक्त, 2051 पोलीस अधिकारी, 11 हजार 500 पोलीस कर्मचारी आदींना बंदोबस्तकामी तैनात करण्यात आले आहे. त्याचबरोबर महत्त्वाच्या ठिकाणी राज्य राखीव दलासह क्यूआरटी, आरसीपी, होमगार्ड जवानांना तैनात करण्यात आले आहे.
तसंच सार्वजनिक ठिकाणी उपद्रव करणे, महिला किंवा मुलींची छेड काढणे, अंमली पदार्थाचं सेवन करणे, सार्वजनिक ठिकाणी दारु पिणे असे प्रकार करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. याच बरोबर रेव्ह पार्टी करणाऱ्यांवर सुद्धा थेट कारवाई केली जाणार आहे.
भाविकांसाठी शिर्डीत बंधन –
शिर्डीत जर तुम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार असाल तर ही बातमी महत्वाची आहे. कारण भाविकांसाठी शिर्डीत बंधन लावण्यात आली आहेत. शिर्डीत साई मंदिराच्या परिसरात आजपासून नो व्हेईकल झोन जाहीर करण्यात आलाय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत होणारी साईभक्तांची गर्दी लक्षात घेता पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतलाय.
2 जानेवारीपर्यंत या भागात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असेल. तसंच भाविकांच्या सुरक्षेसाठी साईनगरीत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलीये. दुसरीकडे शिर्डीत तुम्हाला साईंच्या मंदिरात मास्क घालून जाणं बंधनकारक असेल. भाविकांनी दर्शनाला येताना मास्क घालूनच मंदिरात यावं असं आवाहन करण्यात आलंय.