चिंबळी – चऱ्होली बुद्रुक (ता. खेड) येथे एका कुटुंबाला फिल्मी स्टाइलमध्ये मारहाण करून कुटुंबप्रमुखाचे अपहरण करण्यात आले. याप्रकरणी अंकुश गुलाब राठोड (वय 26) यांनी फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सुभाष पाटील, (रा. कोनावडे, गारगोटी, कोल्हापूर) व त्याच्या पाच ते सहा साथीदारांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अंकुश राठोड हे त्यांचे आई-वडील, पत्नी, भाऊ-भावजयीसोबत टेम्पोमधून कामावर जात होते. त्यावेळी आरोपी पाटील आपल्या साथीदारांसोबत आला. टेम्पोसमोर एक आणि मागे दोन बोलेरो मोटार उभ्या करुन आरोपींनी फिर्यादी यांना अडवले.
टेम्पोत कामासाठी नेत असलेल्या टिकाव व फावड्याचे दांडे घेऊन टेम्पोतील लोकांना मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे वडील गुलाबसिंग राठोड यांना जबरदस्तीने बोलेरोमध्ये बसवून पळवून नेले.