पाबळ – शिरूर पंचायत समितीच्या सभापतिपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिलासाठी नुकतेच जाहीर झाले आहे. पंचायत समितीमध्ये सात महिला सदस्य आहेत, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्राबल्य असलेल्या महिला सदस्यांमधून कोणाची निवड होणार व कोणते निकष लागू शकतात, याविषयी चर्चा जोर धरू लागली आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका व नव्या सरकारमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या समावेश झालेला आहे. खडतर परिस्थितीत पुन्हा उभारी धरण्यात यशस्वी झालेल्या राष्ट्रवादी पक्षात कमालीचे स्थिरत्व आले आहे, त्यामुळे कोणतीही गटबाजी न होता ही निवड होईल, अशी आशा कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
दरम्यान, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून अध्यक्षपदासाठी मोनिका हरगुडे, सविता पऱ्हाड, अर्चना भोसुरे हे प्रमुख दावेदार असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या तीन ज्येष्ठ सदस्यापैकी जे सदस्य सर्वसाधारण प्रवर्गातून, पदाच्या संधीपासून वंचित, विशेष कामगिरी असलेल्या भागातील सदस्या व विशेष कामगिरी करीत आहेत. त्या सदस्याला संधी देतील, अशी चर्चा सुरू आहे. शिरूर पंचायत समितीच्या सभापतिपदासाठी प्रमुख दावेदार असलेल्या मोनिका हरगुडे यांना उपसभापती पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. अर्चना भोसुरे या अपक्ष निवडून आलेल्या आहेत.
त्यांनी राष्ट्रवादीला पाठिंबा दिलेला आहे. सविता पऱ्हाड यांना कोणत्याही महत्त्वाच्या पदावर संधी मिळाली नाही. यावेळी सर्व निकष पूर्ण करीत असल्याने त्यांना सभापतिपदाचा मान मिळेल, अशी चर्चा आहे. मागील पंचायत समिती निवडणुकीत थोडक्या मतांनी पराभूत झालेल्या सविता पऱ्हाड यांनी यावेळच्या निवडणुकीत मताधिक्य घेत विजय मिळविला आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माध्यमातून त्यांची कामगिरीही सरस ठरली आहे. त्यामुळे सभापतिपदाच्या शर्यतीत त्यांच्या बाजूंने कौल मिळणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.