मुंबई – ऍमेझॉन प्राईम वरील लोकप्रिय आणि बहुचर्चित ‘मिर्झापूर’ या वेबसीरीजचा लवकरच दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच ‘मिर्झापूर 2’चा ऑफिशल प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. मिर्झापूरचा नवीन टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ही सीरीज 23 ऑक्टोबर 2020 रोजी ऍमेझॉन प्राईमवर रिलीज होणार आहे.
मिर्झापूर मध्ये अभिनेता पंकज त्रिपाठी गँगस्टरच्या रुपात झळकला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची आता या नवीन सीजनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कारण या सीरीजच्या पहिल्या भागात कालीन भैय्याच्या व्यक्तिरेखेत पंकज त्रिपाठीने चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. पण मिर्झापूरचा दुसरा भाग रीलिज होण्याआधीच वादात सापडतो की काय? अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण सध्या सोशल मीडियावर ‘बॉयकॉट मिर्झापूर 2’ अशी मागणी जोर धरू लागली आहे. ही सीरिज प्रदर्शित होण्यापूर्वीच अनेकांनी त्याला विरोध केला आहे.
मिर्झापूरचा ट्रेलर रीलिज झाल्यावर लगेचच त्यावर मीम्सही बनायला लागली आहेत. काहींनी ‘मिर्झापूर 2’ बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मिर्झापूरमध्ये काम करणारा अभिनेता दिव्येंदू शर्मा याने मात्र “आम्ही अशा मागण्याकडे लक्ष देत नाही” अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. “हा निव्वळ मूर्खपणा आहे”. असंही तो म्हणाला.
मिर्जापूरच्या पहिल्या भागात बबलू आणि गुड्डूची बायको स्विटीचा मृत्यू झाला आहे. या सगळ्यात गुड्डू आणि मुन्ना वाचले आहेत. आता गुड्डू, मुन्ना आणि कालिन या तिघांमधील युद्ध ‘मिर्झापूर 2’ सीझनमध्ये पहायला मिळणार आहे.
उत्तर भारतातील मिर्झापूर या भागात होणारे गुन्हे आणि गुन्हेजगतातील भयानक सत्य या सीरिजच्या पहिल्या भागात दाखविण्यात आले होते. उत्तम पटकथा, संवाद आणि विषयाच्या उत्तम मांडणीमुळे प्रेक्षकांनी पहिल्या सिरीजला उत्तम प्रतिसाद दिला.