तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने पेपर पुढील तारखेला घेण्याची नामुष्की
अंतिम वर्ष ऑनलाइन परीक्षा
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष ऑनलाइन परीक्षेत तांत्रिक समस्या असल्याचे निदर्शनास आले. “एमएसस्सी’च्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेत “इमेजेस’च दिसत नव्हती. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा दि. 17 तारखेला घेण्याचा निर्णय घेत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा दिला. दरम्यान, विद्यापीठाने ऑनलाइन परीक्षा सुरळीत सुरू झाल्याचा दावा केला आहे.
सोमवारी सकाळच्या सत्रात ऑनलाइन परीक्षा सुरळीत सुरू झाली. विद्यार्थ्यांनी मोबाइल, टॅब, संगणकाद्वारे ही परीक्षा दिली. मात्र, एमएसस्सीच्या गणित विषयाचा ऑनलाइन पेपर देताना बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षेत प्रश्नच दिसत नव्हते. त्याऐवजी केवळ प्रश्न क्रमांक आणि पर्याय दिसत होते. त्या ठिकाणी अपेक्षित असलेली आकृतीच दिसत नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना काय उत्तर द्यावे, हेच कळत नव्हते. ही बाब विद्यार्थ्यांनी परीक्षा विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर विद्यापीठाने हा पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ही परीक्षा 17 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.
सोमवारी दिवसभरात परीक्षा योग्य पद्धतीने सुरू झाल्याचे सांगत विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे म्हणाले, ऑनलाइन परीक्षेसाठी 29 हजार 236 विद्यार्थी अपेक्षित होते. त्यापैकी दिवसभरात एकूण 17 हजार 118 विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे ऑनलाइन पद्धतीने परीक्षा दिली. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थीहित हेच ध्येय केंद्रस्थानी ठेवून सर्व व्यवस्था निर्माण केल्या आहेत. परीक्षेपूर्वी काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संयम बाळगून परीक्षेला सामोरे जावे, असे आवाहन त्यांनी केले.
सामूहिकपणे विद्यार्थ्यांनी दिली ऑनलाइन परीक्षा?
घरबसल्या अथवा कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाइन परीक्षा देण्याची सुविधा आहे. ऑनलाइन परीक्षा विद्यार्थी कोणत्या पद्धतीने देत आहेत, त्याची शहानिशा करण्याची कोणतीच यंत्रणा नाही. त्यामुळे गुगलवरून उत्तरे शोधत अथवा अन्य मोबाइलवरून उत्तरे पाहत ऑनलाइन परीक्षा दिल्याची जोरदार चर्चा सोमवारी दिवसभर होती. त्याचप्रमाणे विद्यार्थी एकत्रित येत सामूहिकपणे ऑनलाइन परीक्षा सोडविल्याची चर्चा होती.
दरम्यान, गुगलवरून उत्तरे शोधत परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्यास त्या विद्यार्थ्याची परीक्षा ब्लॉक होईल. मात्र, सामूहिकपणे विद्यार्थी एकत्र येत ऑनलाइन परीक्षा देत असतील, त्यावर अंकुश ठेवण्याची कोणतीच यंत्रणा विद्यापीठाकडे नसल्याचे स्पष्ट होत आहे.