- पतीने डोक्यात सिलेंडर घातलेल्या महिलेचा मृत्यू
पिंपरी – पतीला दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून त्याने पत्नीच्या डोक्यात गॅस सिलेंडर घातला. हा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. 31) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी येथे घडला. सात दिवस जखमी महिलेने मृत्यूशी झुंज दिली. मात्र तिची ही झुंज अपयशी ठरली. बुधवारी (दि. 6) रात्री तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मीना नितिन वकटे (वय 35, रा. बालाजीनगर झापडपट्टी, भोसरी) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती नितीन आयलाजी वकटे (वय 35) याला पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील निरीक्षक प्रदीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत फिर्यादी मीना या घरी असताना आरोपी पती नितीन याने तिच्याकडे दारूसाठी पाचशे रुपये मागितले. मात्र तिने आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगत पतीला पर्सही दाखविली. मात्र पत्नीने दारूसाठी पैसे दिले नाहीत, याचा राग आरोपी नितीन याला आला. संतापलेल्या नितीन याने त्याची पत्नी मीना हिच्या डोक्यात तीनवेळा गॅस सिलेंडर घातला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मीना यांना सुरवातीला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयाचे वाढते बील देणे शक्य नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान बुधवारी (दि.6) रात्री मीना यांचा मृत्यू झाला. यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात कलमवाढ केली असून खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुलांच्या संगोपनाचा प्रश्न
मीना आणि नितीन या दांपत्याला दोन मुले असून मोठा मुलगा नऊ वर्षांचा आहे. तर लहान मुलगी अडीच वर्षाची आहे. एकीकडे आईचे मायेचे छत्र हरपले तर दुसरीकडे वडिल आईच्या खूनाच्या आरोपाखाली तुरूंगात गेले आहे. यामुळे मुलांच्या संगोपनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.