दुबई – आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्जचा संघ अत्यंत निराशाजनक कामगिरी करत असला तरीही चाहत्यांच्या दृष्टीने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आजही सर्वश्रेष्ठ असल्याचे एका पाहणीतून सिद्ध झाले आहे. एका रेडिओ वाहिनीने घेतलेल्या पाहणीतून शेकडो चाहत्यांनी धोनीच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहली व मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा व धोनी यांच्यापैकी यंदा अमिरातीत सुरू असलेल्या स्पर्धेत सर्वश्रेष्ठ कर्णधार व खेळाडू कोण, असा प्रश्न या पाहणीदरम्यान चाहत्यांना विचारण्यात आला होता.
त्यात शेकडो चाहत्यांनी धोनीलाच सर्वाधिक पसंती दिली. धोनी केवळ फिनिशर खेळाडू नाही तर टी-20 चा सर्वोत्तम खेळाडू व कर्णधार असल्याचे मत चाहत्यांनी व्यक्त केले.
सर्वोत्तम टी-20 क्रिकेटपटूंच्या यादीत जगभरातील 128 खेळाडूंचा समावेश होता, त्यात जवळपास 12 लाख लोकांनी आपली मते नोंदवली व धोनीच बेस्ट असल्याचे सांगितले.
टी-20 क्रिकेट प्रकारातील जवळपास 127 सामन्यांचे निरीक्षण केल्यानंतर ही पाहणी करण्यात आली होती. त्यात पहिल्या फेरीत हे तीन खेळाडू होते. त्यानंतर रोहितचे नाव मागे पडले व खरी स्पर्धा कोहली व धोनी यांच्यातच झाली. त्यातून धोनीच विजेता ठरला.