Sri Lanka Cricket | स्टार क्रिकेटपटूंनी पुकारले बंड

श्रीलंका क्रिकेटमध्ये निर्माण होणार वादळ

कोलंबो – श्रीलंकेच्या क्रिकेट विश्‍वात सध्या अनागोंदी सुरू झाल्याचे समोर येत आहे. त्यांच्या संघात सातत्याने डावलले जात असल्याने संतप्त झालेल्या काही प्रमुख क्रिकेटपटूंसह नवोदित खेळाडूंनीही बंडाचे निशाण उभारले आहे. लवकरच यातील काही खेळाडू श्रीलंका हा देशच सोडून अमेरिकेत स्थायिक होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सध्या अमेरिकेत बाल्यावस्थेत असलेल्या क्रिकेटमध्ये सरस कामगिरी करत त्यांच्याच देशाचे प्रतिनिधित्व करण्याचीही संधी त्यांना मिळणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच अमेरिका क्रिकेट संघटनेनेही देशातील क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी या खेळाडूंच्या प्रयत्नांना पाठिंबाही दिला आहे.
श्रीलंका क्रिकेटसाठी सध्या वाईट काळ सुरू आहे.

इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्यांना घरच्याच मैदानावर 2-0 असा पराभ स्वीकारावा लागला होता. त्यातच आता श्रीलंकेतील अनेक क्रिकेटपटूंनी बंडाचे निशाण फडकविले आहे. या क्रिकेटपटूंनी देश सोडण्याचा निर्णयही घेण्याचे सुतोवाच केले आहे. श्रीलंकेचे अनेक खेळाडू आपल्या देशासाठी क्रिकेट खेळणे सोडून अमेरिकेत जाण्याचा विचार करत आहेत.

श्रीलंकेचे अनेक ज्येष्ठ आणि स्थानिक क्रिकेटपटू देश सोडून अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करीत आहेत. जेथे संघात योग्य संधी नसल्यामुळे व पगाराच्या कपातीमुळे ते अमेरिकन क्रिकेट खेळू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुढील महिन्यात अमेरिकेत जाण्याच्या तयारीत असलेल्या खेळाडूंमध्ये श्रीलंकेचा सलामीवीर फलंदाज व स्टार क्रिकेटपटू उपुल थरंगा व दुष्यंत चामेरा यांच्यासह जवळपास 15 खेळाडूंची नावे या क्रिकेटपटूंच्या यादीत आहेत.आपल्याच देशात योग्य संधी न मिळाल्याने तसेच आर्थिकदृष्ट्‌या चांगली साथ मिळाल्यामुळे अनेक खेळाडू निराश झाल्याने नवीन पर्याय शोधत आहेत.

सलामीवीर उपुल थरंगा, वेगवान गोलंदाज दुष्यंत चमीरा, अमिला अपोंसो, मलिंदा पुष्पकुमार, दिलशान मुनवीरा, लाहिरू मधुशंका, मनोज सरतचंद्र आणि निशान पेरीस यासारख्या राष्ट्रीय संघ आणि प्रथम श्रेणी क्रिकेटपटूंनी देश सोडून अमेरिकेला जाण्याचे ठरवले आहे. हे खेळाडून मार्च महिन्यापर्यंत आपल्या देशातील क्रिकेट सोडून अमेरिकेत जातील.

भविष्यासाठीच टोकाचा निर्णय

देशात भविष्य नसल्याने अनेक खेळाडू अमेरिकेला जाण्याच्या निर्णयापर्यंत आले आहेत. पैसे कमी करण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानंतर व पुन्हा आमच्या करारामध्ये वाढ न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेक खेळाडू देश सोडून जाण्याचा विचार करीत आहेत. कमीत कमी 50 हजार डॉलर्स किंवा सुमारे 97 लाख श्रीलंका रुपये तिथे दिले जातात. मोठ्या प्रमाणात खेळाडूंचे स्थलांतर होईल. श्रीलंकेत चांगले भविष्य नाही, असे मंडळातील एका सदस्याने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.