पिंपरी, (प्रतिनिधी) – काळ्या काचेच्या मोटारीवर कारवाईसाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर मोटार घालून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न सोमवारी (दि. ८) करण्यात आला. या घटनेतील आरोपी हा सराईत गुन्हेगार नाही. परंतु या घटनेने सरकारी कर्मचाऱ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे.
यापूर्वी चिंचवडमध्येही वाहतूक पोलिसांच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रयत्न केला असता तो पोलीस बोनेटवर पडला. जवळपास एक किलोमीटरपर्यंत आरोपीने त्या पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवरून नेले. या घटनेतही पोलिसाचा जीव गेला असता. गेल्या सहा वर्षांत ३९४ सरकारी नोकरांवर हल्ले झाल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. त्यामध्ये २७२ पोलिसांचा समावेश आहे.
सर्वसामान्य नागरिकांनाही पोलिसांची भिती राहिलेली नाही, हेच या आकड्यांवरुन दिसून येते. कायदा आणि सर्वसामान्यांचे रक्षण’ करणारे ‘खाकी’ वर्दीतील ‘रक्षक’देखील सुरक्षित नसल्याचे चित्र आहे.
पूर्वी रस्त्यावरून पोलीस निघाले की, पळता भुई थोडी व्हायची. हातात काठी… डोक्यावर टोपी व अंगातील खाकी वर्दीमुळे एक वेगळाच दबदबा होता. आता तो दबदबा कमी होताना दिसत आहे. पोलिसांना टोपीची तर ‘अॅलर्जी’ झालीय. हातातील काठी गायब झाली आहे. आंदोलन, बंदोबस्त किंवा कुठे अनुचित प्रकार घडला तरच हातात काठी दिसते.
पोलिसांवरच हल्ले होऊ लागल्याने सर्वसामान्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायचे म्हटले तर नोकरी पुढे दिसते. आपल्या हातून विपरीत घडले तर निलंबित होऊ शकतो, असा विचार त्यांच्या डोक्यात घोळतो. संबंधितावर गुन्हा दाखल करून त्याला कायद्यानेच उत्तर दिले जाते. काही पोलिसांवर गंभीर आरोप होऊन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन होण्यास व दबदबा कमी होण्याचे हेही एक कारण आहे.
नाकाबंदीत अंगावर गाडी घालण्याचे प्रकार
चौका-चौकांतील गस्त कमी झाली आहे. वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे पोलीस कर्मचारीही जे आहे तेवढेच काम करून गप्प आहेत. ‘वर्दी’चा आक्रमकपणा वाढविण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करण्याची गरज आहे. नाकाबंदी केल्यानंतर वाहने अडविली जातात. पण काही वाहनधारक पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून पळून जातात.
आकडे बोलतात…
वर्ष पोलिसांवर झालेले हल्ले इतर सरकारी नोकरांवर झालेले हल्ले एकूण
२०१८ ४० २२ ६२
२०१९ ३२ २२ ५४
२०२० ४१ ०९ ५०
२०२१ ७८ २० ९८
२०२२ ५१ १९ ७०
२०२३ २८ ३० ५८
२०२४ ०२ ०० ०२
—————-
एकूण २७२ १२२ ३९४