तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांची धाकधूक : चौकशीत गोलमाल उघड?
डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार, अपहार, अनियमितता झाल्याच्या आरोपाबद्दल सखोल चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. झारगडवाडी ग्रामपंचायतीची दफ्तर तपासणी कधी होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली असून चौकशीतून गोलमाल उघड होणार काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
झारगडवाडी ग्रामपंचायतीमधील 14/15 वा वित्त आयोग, नागरी सुविधा निधी, जिल्हा निधी, ग्रामनिधीबाबत दफ्तरची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. यानुसार दि. 7 सप्टेंबरपासून ग्रामपंचायतमध्ये चौकशी सुरू झाली आहे. यासाठी वेल्हे येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज शेळके, पुरंदर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विद्याधर ताकवणे यांची नियुक्ती दप्तर चौकशीसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी वाढल्या होत्या. त्याच अनुषंगाने ग्रामपंचायत कामकाजबाबत अनियमितता यामुळे स्थानिक नागरिकांच्या मनामध्ये ग्रामपंचायतीत मोठ्या प्रमाणात अपहार झाल्याच्या चर्चा झाल्या होत्या. त्यामुळेच सामाजिक कार्यकर्ते युवराज पोटे आणि त्यांचे इतर सहकारी यांनी मिळून पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायतमधील 14/15 वा वित्त आयोग, नागरी सुविधा निधी, जिल्हा निधी, ग्रामनिधीबाबत दफ्तराची सखोल चौकशी करण्याची मागणी दि. 28 ऑगस्ट रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती. त्यानुसार चौकशी सुरू झाली आहे.
तीनवेळा चौकशीचा फार्स
आतापर्यंत तीन वेळा अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे झाली आहेत. त्यामुळे दप्तरी चौकशीदरम्यान अवधी लागत आहे. चौकशीत तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांची मात्र धाकधूक वाढली आहे. त्यामुळे तपासणीमधून नेमक काय उघड होणार, याकडे संपूर्ण गावाबरोबरच पंचक्रोशीतील गावांचे लक्ष लागून राहिले आहे.