969 नवीन रुग्ण, तर 1 हजार 60 जण बरे; पुणेकरांना काहीसा दिलासा
पुणे – शहरात बाधितबरोबर आता मृत्यूच्या संख्येतही घट होण्यास सुरुवात झाली आहे. मागील महिन्याभरापासून दररोजची मृत्यूसंख्या तब्बल 60 ते 62 वर पोहोचली होती. मात्र, दोन दिवसांपासून ही संख्या निम्म्याने कमी झाल्याचे पाहायला मिळते. गेल्या 24 तासांत 22 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी दिवसभरात 969 नवीन रुग्ण सापडले, तर 1 हजार 60 जण बरे झाले.
शहर आणि ग्रामीण भागांत दररोज साठहून अधिक अत्यवस्थ रुग्णांचा मृत्यू होत होता. त्यामध्ये एकट्या पुणे शहरातील मृत्यूची संख्या 35 ते 48 असायची तर अन्य ग्रामीण व अन्य जिल्ह्यांतून उपचारासाठी आलेल्यांची होती. मात्र, दोन दिवसांपासून ही संख्या जवळपास निम्म्याने घटली आहे.
दिवसभरात 5 हजार 438 जणांची तपासणी करण्यात आली. शहरातील बाधित संख्येने दीड लाखांचा टप्पा पार केला असून, त्यातील 1 लाख 33 हजार 600 बाधित करोनामुक्त झाले आहेत.
शहरात सध्या 908 बाधित अत्यवस्थ असून, त्यातील 493 जणांना व्हेंटिलेटर लावला आहे. तर 415 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.