वाघोली, दि. 14 (प्रतिनिधी) -अष्टापूर (ता. हवेली) येथील पुणे ट्यूब मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जप्त केलेल्या मालमत्तेवर युनियन बॅंकेच्या अधिकाऱ्याने अस्तित्वात नसलेली सुरक्षा एजन्सी नेमल्याचे दाखवून त्यांच्या पगारापोटी बॅंकेकडून पैसे घेतले. त्याचवेळी जप्त केलेल्या कंपनीतील मालमत्तेची परस्पर विल्हेवाट लावून 2 कोटी 28 लाख 38 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी युनियन बॅंक ऑफ इंडियाच्या तत्कालीन बॅंक अधिकाऱ्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत युनियन बॅंक ऑफ इंडियाचे सहायक व्यवस्थापक ग्यानेंद्रकुमार शिवकुमार सिंग (रा. मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अनिलकुमार सिंग (रा. गोकुळ विहार कॉम्प्लेक्स, मुंबई) आणि संचालक शिवशक्ती असोसिएट (रा. मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. 20 जानेवारी ते दि. 28 ऑगस्ट 2022 दरम्यान घडला आहे. फिर्यादी सिंग हे युनियन बॅंक ऑफ इंडिया ऍसेट रिकव्हरी मॅनेजमेंट ब्रांच मुंबई येथे सहायक व्यवस्थापक आहेत. बॅंकेने अतुल दुधे यांच्या पुणे ट्युब मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला कर्ज दिले होते. कर्ज न फेडल्यामुळे तारण मालमत्ता म्हणून बॅंकेचे पूर्व व्यवस्थापक अनिलकुमार सिंग यांनी कारखाना सील केला.
बॅंकेच्या सुरक्षा एजन्सी नियुक्त करण्याच्या धोरणाकडे दुर्लक्ष करून कर्तव्यात हयगय केली. शिवशक्ती सुरक्षा असोसिएट मुंबई या खासगी सुरक्षा एजन्सीकडे लायसन्स नसताना कर्ज तारण मालमत्ता त्यांच्या ताब्यात दिली. कायमस्वरूपी तीन सुरक्षा रक्षक नेमणूक केल्याचे दाखवून त्यांचा पगार बॅंकेमार्फत दिला. फिर्यादी ग्यानेंद्रकुमार यांनी कंपनीला भेट दिली असता तेथे साध्या वेशातील सुरक्षा रक्षक होते. तसेच कंपनीतील मशिनरी चोरीला गेली असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी चौकशी केल्यावर अशी नोंदणीकृत सुरक्षा एजन्सी नसल्याचे आढळले. त्यामुळे 2 कोटी 28 लाख 38 हजार रुपयांच्या मालमत्तेचा अपहार होण्यास कारणीभूत ठरल्यावरुन अनिलकुमार सिंग यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.