प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 14 -शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहराच्या सर्वच रस्त्यांवर जवळपास तासभर पाण्याची तळी साचली होती. त्यामुळे महापालिकेने पावसाळ्यापूर्वी केलेले आणि पावसाळ्यात खड्डे पडल्यानंतर केलेले रस्ते पुन्हा खड्डेमय झाले आहेत. त्यावर, मलमपट्टी म्हणून महापालिकेकडून केवळ खडी आणि डस्टचे मिश्रण टाकून रस्ते दुरुस्ती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, हे खड्डे दुरुस्त केल्यानंतर अवघ्या 10 ते 15 मिनिटांतच त्यावरून वाहने जात असल्याने हे खड्डे पुन्हा “जैसे थे’ होत असल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला आहे.
रविवारी झालेल्या पावसाने शहरात अवघ्या महिन्यापूर्वी दुरुस्त केलेले खड्डे पुन्हा अवतरले आहेत. त्यामुळे पालिकेवर टीका सुरू झाल्याने महापालिकेने मिळेल तसे खड्डे दुरुस्तीचे काम सुरू केले असून, अवघ्या काही तासांतच पुन्हा खड्डे पडत आहेत.
फक्त खडी आणि डस्ट
महापालिकेकडून पावसाळ्यात रस्ते दुरुस्ती करण्यासाठी कोल्डमिक्सचा वापर केला जातो. मात्र, फक्त डस्ट आणि खडी खड्डयांमध्ये टाकली जात असल्याचा प्रकार शंकरशेठ रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या खालील बाजूस समोर आला आहे. या ठिकाणी खड्डे दुरुस्तीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील खड्ड्यातील पाणी न काढताच त्यात डस्ट आणि खडी टाकली आहे. त्यानंतर हे वाहन पुढील खड्डे दुरुस्त करण्यासाठी निघून गेले.
अवघ्या काही मिनिटांतच या खड्ड्यातील खडी आणि डस्ट वाहनांच्या वर्दळीमुळे निघून जात असून, खड्डे तासाभरातच “जैसे थे’ होत असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे रस्त्यांची ही केवळ दिखाऊ दुरुस्ती सुरू असून, याबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
ड्रेनेजची झाकणे तशीच
शहरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने महापालिकेच्या यंत्रणेकडून रस्त्यावरील ड्रेनेजची झाकणे काढून पाण्याला वाट मोकळी करून दिली. मात्र, त्यानंतर ही झाकणे पुन्हा बंद करणे आवश्यक असताना प्रशासनाकडून ती तशीच उघडी ठेवण्यात आली आहेत अथवा अर्धवट बसविण्यात आली आहेत. बिबवेवाडीतील डॉल्फिन चौकात ही झाकणे उघडीच ठेवण्यात आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.