78 टक्क्यांवर बाधित करोनामुक्त
पुणे – शहरात दि.17 ऑगस्टअखेर करोनाचे अवघे 19.30 टक्के सक्रीय बाधित आहेत. तर तब्बल 78.32 टक्के जणांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत सुमारे 2.38 टक्के बाधितांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यातील सुमारे सुमारे 85 टक्के रूग्णांचे वय 50 च्या पुढे आहे. त्यामुळे महापालिकेने आता ज्येष्ठ नागरिकांवर लक्ष केंद्रीत केले असून, घरोघरी जाऊन त्यांची माहिती संकलित केली जात आहे.
मार्चमध्ये पहिला बाधित सापडल्यानंतर शहरात करोनाच्या नवीन बाधितांची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढली. जूननंतर ही वाढ मोठ्या प्रमाणात झाली, तर जुलैअखेर नवीन बाधितांच्या आकड्याने उच्चांक गाठला. मात्र, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात ही बाधित संख्या कमी होण्यास सुरुवात झाली असून, एकूण बाधितांच्या तुलनेत सक्रिय बाधितांचा आकडा पहिल्यांदाच 19.30 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दि.17 ऑगस्टअखेर शहरात एकूण 74,933 पैकी 58 हजार 706 जण करोनामुक्त झाले. तर सुमारे 1,785 जणांचा करोनाने मृत्यू झाला असून, त्यातील अनेकजण शहराबाहेरील आहेत.