सुरेश जगदाळे : अतुल बेनके यांच्या प्रचार्थ पिंपळवंडी-कांदळी गटात गावभेट दौरा
नारायणगाव- सध्याचे लोकप्रतिनिधीनी जनतेला फसवल्याशिवाय कुठलेच काम केलेले नाही. मागील निवडणुकीत चुकून ते निवडून आले; परंतु आता बदल होणार असून आमचे शिरोली सुलतानपूर शरद पवारांना मानणारे गाव आहे. लोकसभेला ज्या प्रमाणे डॉ.अमोल कोल्हे यांना भरघोस असे मतदान केले होते, त्याहून अधिक मतदान राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांना करणार आहोत, अशी ग्वाही जयशंकर दूध संस्थेचे अध्यक्ष सुरेश जगदाळे यांनी दिली.
जुन्नर विधानसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार अतुल बेनके यांची शुक्रवारी (दि. 11) पिंपळवंडी-कांदळी जिल्हा परिषद गटातील शिरोली सुलतानपूर या ठिकाणी गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी जगदाळे हे बोलत होते. यावेळी या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य शरद लेंडे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पाडुरंग पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपत फुलवडे, जिल्हा दूध संघाचे संचालक बाळासाहेब खिलारी, अनिल घोलप, अजित लेंडे, सुलतानपुर गावचे माजी सरपंच जयसिंग गुंजाळ, मंगेश खिंलारी, पंचायत समीती सदस्य शाम माळी आदी मान्यवर उपस्थित होते.
शाम माळी म्हणाले की, भविष्यात या भागाचा विकास अधिक करायचा आहे, त्यामुळे अतुल बेनके यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणार, असे त्यांनी नमूद केले. शरद लेंडे म्हणाले की , जुन्नर तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी कुठलीही भरीव अशी कामे केलेली नाहीत, त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाने दिलेले उमेदवार बेनके यांना विजयी करून शरद पवार यांचे हात बळकट करावे, असे आवाहन त्यांनी केले.
- जुन्नर तालुक्यात रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी येडगाव येथे यशवंतराव चव्हाण यांचे स्मारक उभारणार जेणे करून याठिकाणी 10 ते 15 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, तसेच कांदळी येथील औद्योगिक वसाहतीमुळे 2 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. नवीन औद्योगिक वसाहत फेज 2 सुरू झाल्यानंतर आणखीन 2 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होईल. तालुक्यातील धरणातील पाण्याचे योग्य नियोजन करण्यात येईल.
– अतुल बेनके, उमेवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जुन्नर विधानसभा मतदारसंघ