- 1327 नवीन बाधित
- 73 रुग्णांचा मृत्यू
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. मात्र मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. आज शहरात नवीन 1327 बाधितांची नोंद झाली. तर तब्बल 73 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. आजपर्यंत शहरात 2 लाख 38 हजार 752 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पालिकेने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, गुरुवारी (दि. 13) शहरात 1327 जणांना करोनाची लागण झाली. तर शहराबाहेरील रुग्णांची आकडेवारी पालिका प्रशासनाने प्रसिद्ध केली नाही. आजपर्यंत शहरातील 2 लाख 38 हजार 752 जणांना करोनाची लागण झाली आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृतांच्या संख्येत सातत्याने भर पडत आहे. आज दिवसभरात 73 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामध्ये शहरातील 47 व शहराबाहेरील 26 जणांचा समावेश आहे. आजपर्यंत शहरात 4317 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 3516 जणांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील 1801 जणांचा मृत्यू झाला आहे.
दिवसभरामध्ये 2057 रुग्ण बरे झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2 लाख 13 हजार 928 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 8875 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये तपासणीसाठी दाखल केले आहे. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. किती रुग्णांचे अहवाल प्रतिक्षेत आहेत याबाबत पालिकेने आकडेवारी जाहीर केली नाही. सद्यस्थितीत शहरातील महापालिकेच्या रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 6000 रुग्ण उपचार घेत आहेत. तर गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची संख्या 15,308 इतकी आहे. दोन्ही मिळून उपचाराधीन असलेल्या रुग्णांची संख्या 21,308 इतकी आहे.
मावळ तालुक्यात 218 बाधित; पाच जणांचा मृत्यू
मावळ तालुक्यात गुरुवारी (दि. 13) 218 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यात दिवसभरात 192 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज शहरी भागात रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. आज पाच रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला असून, आतापर्यंत 332 रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. सद्यःस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 2257 आहे. शहरी भागात 169 तर ग्रामीण भागात 49 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीत 122 रुग्ण सापडले. लोणावळा नगर परिषदेच्या हद्दीत 35 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत 12 रुग्ण सापडले. तालुक्यातील करोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 16,686 झाली आहे. तर दिवसभरात 192 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत.