मपगलियोट (पाकिस्तान) – पाकिस्तानातील मोफत धान्य पीठाच्या गोण्यांची सरकारी अधिकाऱ्यांकडूनच चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. धान्य पीठाच्या तब्बल 8 हजार गोण्यांची चोरी केल्याबद्दल 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये एका सरकारी कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
चिनियोट शहरातील गव्हर्नमेंट इस्लामिया कॉलेजमधील मोफत पीठ वाटप केंद्रावर बनावट टोकन जमा झाल्याचे आढळून आले. लाबार्थ्यांना टोकन वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्याने बनावट टोकन जमा केल्याचे तपासात उघड झाले. सुमारे 7 ते 8 हजार टोकन लुबाडल्याचे या कर्मचाऱ्याने कबूल केले आहे.
या फसवणूकीमुळे पाकिस्तानचे 5 ते 6 दशलक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी चार जणांना अटकही केली असून, उर्वरित लोकांच्या अटकेसाठी छापेमारी सुरू आहे. तिनियोट जिल्ह्यात मोफत धान्य पीठांच्या 5 लाख गोण्यांचे आतापर्यंत वाटप झाले आहे.
दरम्यान रमजान महिन्यात पाकिस्तानातील वेगवेगळ्या प्रांतातील पीठ वितरण केंद्रांवर चेंगराचेंगरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. पीठ वितरणाच्या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे.