पवना धरणात अवघा 46 टक्के

पाणीसाठा पावसाच्या दडीने चिंता वाढली

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच मावळ पट्टयात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पवना धरणातील पाणीसाठी कसाबसा निम्म्यावर पोहचू शकला आहे. पावसाची विश्रांती आणखी काही दिवस अशीच सुरू राहिली तर पिंपरी-चिंचवडकरांसाठी पाणीटंचाईचे संकट आणखी तीव्र होऊ शकते. गेल्या वर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात जवळपास निम्मास पाऊस पडला आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्माच पाणी साठा आहे.

पवना धरणातील पाणीसाठा आणि पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच दोन एमआयडीसी आणि परिसरातील अन्य ग्रामपंचायतींना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना लोकसभा निवडणुकीनंतर आतापर्यंत शहरात दोनदा पाणी कपात लागू करण्यात आली. आता शहरात दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, 7 जूनला हजेरी लावलेल्या पावसाने दडी मारत जुलै महिना उजडेपर्यंत चांगलेच जेरीस आणले.

जुलै महिन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात बरसलेल्या पावसाने मावळातील नदी, नाले, ओढे, धबधबे खळखळून वाहू लागले होते. 12 जुलैनंतर मात्र पावसाचा जोर ओसरु लागला आणि मागील आठवडाभरापासून पाऊस पूर्णपणे विश्रांती घेत आहे. रोज दिवसभर उन्हाळ्याप्रमाणे उकाडा जाणवत असल्याने पाऊस पडेल अशी रोज अपेक्षा वाटते, ढगही दाटून येतात, परंतु अपेक्षेप्रमाणे न बरसता एक-दोन सरी बरसवून निघून जात आहेत. धरणक्षेत्रात तर गेल्या काही दिवसांमध्ये तेवढाही पाऊस पडला नाही. जुलै महिन्यामध्ये पाऊस इतका कधीच मंदावत नाही. वर्षानुवर्षांपासून जुलै ते सप्टेंबरपर्यंत धो-धो कोसळणारे धबधबे यावर्षी मात्र जुलैच्या मध्यालाच आटू लागल्याने चिंता वाढू लागली आहे.

गेल्यावर्षी आजपर्यंत 2030 मी.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. तर धरणातील पाणीसाठा 90.65 टक्‍क्‍यांवर पोचला होता. यंदा मात्र आतापर्यंत 1 जूनपासून केवळ निम्मा म्हणजेच 1130 मी.मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत शून्य मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. डोंगरावरुन येणाऱ्या नैसर्गिक जलस्त्रोतांच्या पाण्यामुळे पाणीसाठ्यात केवळ 0.18 टक्के वाढ झाली आहे. दरवर्षी होणाऱ्या समाधानकारक पावसामुळे पवना धरण 100 टक्के भरल्याने, धरणाचे काही दरवाजे खुले करुन, पाणी सोडावे लागत होते. तर परतीच्या पावसाने पुन्हा हे धरण 100 टक्के भरत होते.

गेल्यावर्षी मात्र परतीच्या पावसाने ओढ दिल्याने यावर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी धरणातील पाणीसाठा 13 टक्‍क्‍यांपर्यंत खाली उतरला होता. पावसाळा देखील उशिरा सुरू झाला होता. पावसाळा सुरू झाल्यावर धरण भरेल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात होती, परंतु धरण निम्मेही भरले नाही. धरणातील पाणीसाठा 46.54 टक्के इतका असून गतर्षीच्या तुलनेत तो 44.11 टक्के एवढा कमी आहे.

जलसंपदा विभागाने वेळोवेळीकेलेल्या सूचनांकडे महापालिका प्रशासनाने दूर्लक्ष केल्याने शहरात दोनवेळा पाणीकपात करावी लागली आहे. मात्र, पावसाने लावलेल्या हजेरीनंतर शहरातील पाणीकपात कायम ठेवण्यात आल्यामुळे धरणसाठ्यात घट झालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

यंदा सरासरी पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. अद्याप पावसाळ्याचे दोन महिने बाकी आहेत. या कालावधीत समाधानकारक पाऊस होऊन, पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ होईल. त्यामुळे शहरावर कोणत्याही प्रकारचे पाणीसंकट असणार नाही, अशी आशा बाळगू.

राहुल जाधव, महापौर, 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)