पिंपळे सौदागर येथील माणुसकीला काळिमा फासणारी घटना
पिंपरी – आईच्या कुशीत ती निवांत झोपली होती… परंतु पहाटे उठून पाहिले तर ती तिथे नव्हती… शोध घेतला, परंतु ती सापडली नाही… सापडला तो तिचा मृतदेह…आईच्या कुशीत झोपलेल्या अडीच वर्षांच्या बालिकेला उचलून नेऊन नराधमाने बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना पिंपळे सौदागर येथे घडली. हत्येनंतर या चिमुकलीचा मृतदेह लष्कराच्या मैदानात टाकून देण्यात आला.
पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे-सौदागर येथे एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी बालिकेचे आई-वडील मजूर म्हणून काम करतात. हे दाम्पत्य छतीसगढचे आहे. सौदागरमधील लेबर कॅम्पमध्ये हे कुटूंब पत्र्याच्या खोलीत राहते. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे चिमुकली आई-वडिलांसोबत घरात झोपली होती. मध्यरात्रीच्या सुमारास निवांत झोपलेल्या निष्पाप बालिकेला उचलून नेले.
पहाटे जाग आल्यानंतर चिमुकली आसपास न दिसल्याने कुटुंबियांनी आणि नातेवाईकांनी सगळीकडे शोधाशोध सुरू केली मात्र, ती आढळून आली नाही. त्यानंतर कुटंबियांनी सांगवी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांसह नातेवाईक चिमुकलीचा शोध घेत असताना मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह पिंपळे-सौदागर येथील लष्कराच्या हद्दीतील मोकळ्या जागेत आढळून आला. चिमुकलीचा खून झाल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी औंध रुग्णालयात पाठवला. त्यानंतर शवविच्छेदनात चिमुकलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याचे निष्पन्न झाले.