मुंबई – आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका आहे. यामध्ये पाच महानगर पालिकांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने जय्यत तयारी सुरू केली आहे. राजकीय व्युहरचना करण्यासाठी राष्ट्रवादीकडून बैठकांचा धडाका सुरू आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवारांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अॅक्शन मोडमध्ये असल्याचं समजतं.
येत्या 8 सप्टेंबरला मुंबईतील पक्ष कार्यालयात शरद पवारांच्या नेतृत्वात विधानसभेतील पराभूत उमेदवारांची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे.
या बैठकीत नेत्यांना काही महत्त्वाच्या सूचना तसंच विविध विषयांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पडत असल्याने स्थानिक पातळीवरचे निर्णय तिथल्या स्थानिक नेत्यांवर सोपविण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वक्तव्य आधीच राष्ट्रवादीकडून करण्यात आला होतं.