पिंपरी- मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगीचा सण साजरा केला जातो. शहरात हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी बाजरीची भाकरी, मिक्स भाजीचा आस्वाद घेत एकमेकांना शुभेच्छा दिल्या. तसेच रविवारी हा सण आल्याने नागरिकांनी तो कुटुंबीयांसमवेत उत्साहात साजरा केला.
यंदा मकरसंक्रांतीचा सण सोमवारी (दि. १५) साजरा होत आहे. त्यामुळे रविवारचे औचित्य साधून नागरिकांना खरेदीचा आनंद लुटता आला. रविवारी बाजारात खरेदीसाठी महिलांची मोठी गर्दी होती. संक्रांतीनिमित्त महिला वाण लुटतात. त्यामुळे त्याच्या खरेदीसाठी एकच गर्दी बाजारात झाली होती. वाण म्हणून लुटण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य बाजारात उपलब्ध असून ५० रुपये डझनापासूनच्या वस्तू उपलब्ध आहेत. त्यात रोजच्या वापराच्या वस्तूंचा जास्त समावेश असून, गेल्या काही दिवसांपासून विविध झाडांची रोपे देण्याची प्रथा सुरू झाल्याने नर्सरीमध्ये रोपांनाही मागणी आहे.
तसेच संक्रांतीनिमित्त हलव्याच्या दागिन्यांना विशेष महत्त्व असते. नवविवाहित दांपत्य हे दागिने घालतात. त्यामुळे बाजूबंद, बांगड्या, बिंदी, अंगठी, गळ्यातील माळ, झुमके आदींचा सेट विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच संक्रांतीनिमित्त खास तिळगुळाच्या वड्या, लाडू, चिक्की आणि तिळगुळाचा हलवा विक्रीसाठी बाजारात उपलब्ध असून खरेदासाठी महिलांची मोठी गर्दी आहे.
इंग्रजी वर्षाची सुरुवात मकर संक्रांतीच्या सणाने होते. हा सण आयुष्याचा गोडवा वाढवणारा व हा गोडवा वर्षभर टिकवायचा प्रयत्न केला जातो. भोगीच्या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी केली जाते. यात प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात. शहरात घरोघरी भोगी निमित्त मिश्र भाज्या, तीळ लावलेली बाजरीची भाकरी खिचडी असा बेत अनेकांनी आखलेला होता. त्याचा अस्वाद घेत अनेकांनी दुस-या दिवसाची अर्थात मकरसंक्रांतीची तयारी केली.