विवाहानंतर गोव्याला दोन आठवड्यासाठी हनिमूनला जाणार
अहमदाबाद : विवाह हे केवळ दोन जीवांचे मिलन नसते तर दोन कुटुंबांचे मिलन असते. अशा प्रकारचे वाक्य भारतीय संस्कृतीमध्ये नेहमीच वापरली जात असली तरी या सांस्कृतिक परंपरेला छेद देणारी घटना गुजरातमध्ये घडणार आहे. गुजरातमधील एक तरुणी स्वतःशीच लग्न करणार असून लग्न समारंभ झाल्यानंतर हनिमूनला गोव्यालाही एकटीच जाणार आहे.
गुजरातमधील या तरुणीचे नाव क्षमा बिंदू असे असून ती 24 वर्षीय आहे. येत्या 11 जून रोजी एका मंदिरात ती स्वतःशीच विवाह करणार आहे. तिच्या आई वडिलांनीही या विवाहाला संमती दिली आहे. पारंपरिक पद्धतीने सर्व विधी करून हा विवाह सोहळा पार पाडला जाणार आहे. शमा बिंदूने स्वतःचीच विवाह केल्यानंतर तेथेच ही घटना संपणार नसून त्यानंतर ती दोन आठवड्यांसाठी हनीमूनसाठी गोव्यालाही जाणार आहे त्यासाठी तिने विमानाची तिकिटेही बुक केली आहेत.
भारतासाठी अशा प्रकारचा विवाह ही वेगळी घटना असली तरी परदेशात अनेक ठिकाणी अशा प्रकारचे विवाह होत आहेत. इंग्रजीमध्ये या विवाह प्रथेला सोलोगामी असे म्हटले जाते. वैवाहिक आयुष्यासाठी इतर कोणाला जोडीदार म्हणून निवडण्याऐवजी आयुष्यभर स्वतःला स्वतःचा जोडीदार मानण्याची ही विवाह प्रथा आधुनिक काळामध्ये हळूहळू रुजू लागली आहे. भारतामधील हे अशा प्रकारचे पहिलेच लग्न असले तरी परदेशात अनेक घडल्या आहेत खास करून मुलींमध्ये सोलोगामी करण्याची प्रथा सर्वात जास्त आहे.
आयुष्यभरासाठी कोणाशीही बांधील राहण्याऐवजी स्वतःला स्वतःचा जोडीदार म्हणून आयुष्य व्यतीत करणे ही संकल्पना सोलोगामी या विवाहाच्या प्रकारामागे आहे. क्षमाचा विवाह 11 जून रोजी होणार असून त्यानिमित्ताने भारतात ही प्रथा सुरू होणार आहे त्याबाबत भारतात सोशल मीडियामध्ये उलट-सुलट प्रतिक्रियांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे 11 जून रोजी प्रत्यक्ष विवाह पार पडला की त्यानंतर सोशल मीडिया अजूनच सक्रिय होणार अशी लक्षणे दिसत आहेत.