पॅरिस – फ्रान्समध्ये लागू करण्यात आलेल्या कोविड पासला विरोध करणाऱ्या गटाने सत्तारुढ ला रिपब्लिक एन मार्च या पक्षाच्या एका खासदाराच्या अंगावर घाण टाकण्याचा प्रकार नुकताच घडला. स्टिफन क्लारोक्स असे या खासदाराचे नाव आहे.
फ्रान्समध्ये ज्या नागरिकांनी करोना विरोधी लस घेतलेली नाही, अशांबाबत अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्या रागातून नागरिकांनी हे कृत्य केले.
क्लारोक्स हे सेंट पिएर आणि मॅक्युलॉन या मतदारसंघातील संसद सदस्य आहेत. क्लारोक्स यांच्या घराबाहेरच जमावाने त्यांच्या अंगावर समिष खाद्यपदार्थांमधील त्याज्य भाग आणि अन्य घाण फेकली. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या प्रकारानंतर क्लारोक्स यांनी आंदोलकांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. “योग्य निर्णय घेतले जात नसल्याचे काही लोकांना वाटते आहे. आम्हा सर्वांना ठार मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. मात्र हा प्रकार आता थांबला पाहिजे,’ असे क्लारोक्स यांनी म्हटले आहे.
फ्रान्सचे विदेश व्यवहार मंत्री ऍनिक गिराडीन यांनी या प्रकारावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी क्लारोक्स यांच्यावर घाण फेकण्याच्या घटनेचा फोटोही ट्विटरवर पोस्ट केला आहे.