पिंपरी (प्रतिनिधी) – वायसीएम रुग्णालयाच्या धर्तीवर आता महापालिकेच्या इतरही चार रुग्णालयांत हृदयाशी संबंधित आजारावर उपचाराची सुविधा मिळणार आहे. डाॅपलर, टू डी इको या सुविधांचा देखील समावेश करण्यात आला आहे. आकुर्डी येथील हभप प्रभाकर कुटे रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, जिजामाता रुग्णालयामध्ये ही सुविधा देण्यात येणार आहे. आयुक्त शेखर सिंह यांनी नुकतीच त्याला मान्यता दिली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात सध्या एका खासगी संस्थेशी संलग्नित करून हृदयावरील आजारांवर उपचार केले जात आहेत. त्याचा शहरातील अनेक नागरिक लाभ घेत आहेत. महापालिकेचे एकच रुग्णालय असल्याने त्याकडे रुग्णांची उपचारासाठी मोठी गर्दी होत असे. आता रुग्णालयावरील रुग्णांचा हा ताण कमी होणार आहे.
महापालिकेच्या आणखी इतर चार रुग्णालयात हृदयावरील आजारावर उपचार करण्यासाठी सुविधा देण्याला आयुक्तांनी मंजुरी दिली आहे. महापालिकेच्या आकुर्डी येथील हभप प्रभाकर कुटे रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, जिजामाता रुग्णालयामध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये डाॅपलर, टू डी इको आदी सुविधांचा समावेश आहे.
वायसीएम मध्ये असलेल्या रूबी एलकेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मार्फत त्याच दराने हे उपचार केले जाणार आहेत. २१ डिसेंबर २०१३ रोजी आयुक्तांच्या दालनात हा निर्णय घेण्यात आला होता. सदर बाब नव्याने सुरू करत असल्याने धोरणात्मक निर्णयामुळे महापालिका सभेची मान्यता आवश्यक होती. त्यानुसार आयुक्त शेखर सिंह यांनी त्याला मान्यता दिली. चार रुग्णालयात हृदयावरील संबंधीत आजारांवर उपचार होऊ लागल्यास नागरिकांची वायसीएमकडे होणारी पायपीट थांबणार आहे.