नाशिक – आम्ही भाजपची बी टीम नाही. भाजपला रोखण्यासाठी आम्ही महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेससोबत युती करण्यास तयार आहोत, असं विधान एआयएमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलं होतं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात ढवळून निघालं आहे. आता यावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भुजबळ यांनी थेट जलील यांना राष्ट्रवादीत येण्याचं आमंत्रण दिलं आहे. भुजबळ म्हणाले की, इम्तियाज जलील एमआयएमचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत आले, तर त्यांना पक्षात घ्यायला काहीच हरकत नाही. राष्ट्रवादीच्या धोरणाप्रमाणे जलील यांना काम करावं लागेल. पवार साहेब देखील जलील यांना राष्ट्रवादीत घेतील,” असंही भुजबळ म्हणाले.
याआधी विकास कामांसाठी राजकीय स्तरावर एकत्र येण्यास समविचारी पक्ष तयार असतील तर आनंदाची गोष्ट आहे. विकास कामासाठी समविचारी पक्ष एकत्र येऊन राज्याचे भले होणार असेल तर ही आनंदाची बाब आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत व्यक्त केले.
एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांनी इम्तियाज जलील यांच्या विधानावर मत व्यक्त केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच महाविकास आघाडीत एमआयएमला स्थान मिळत की काय, अशा चर्चा रंगल्या आहेत.