नवी दिल्ली – भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली. यानुसार नव्या वर्षाममध्ये ३ जानेवारीपासून देशामध्ये १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचं देखील प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी नमूद केलं.
करोना विषाणूच्या ओमायक्रॉन प्रकारामुळे जगभरात चिंतेचे वातावरण असून अनेक देशांमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. ओमायक्रॉनने भारतामध्ये देखील प्रवेश केल्याने देशात देखील भीतीचे वातावरण आहे. अशातच आज पंतप्रधान मोदी यांनी नागरिकांना घाबरून न जाता करोना संदर्भातील सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले.
देशातील आरोग्यकर्मींना मिळणार बूस्टर डोस
दरम्यान, प्रधानमंत्री मोदी यांनी आजच्या संबोधनामध्ये आणखी एक महत्वपूर्ण घोषणा केली. देशातील आरोग्यकर्मींना नववर्षात १० जानेवारीपासून बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. जगभरामध्ये सध्या ओमायक्रॉनच्या सावटामुळे बूस्टर डोसची चर्चा रंगली असतानाच भारत सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
सहव्याधी असलेल्यांनाही बूस्टर
६० वर्षांनवरील जे नागरिक इतर आजारांनी ग्रासलेले आहेत अशांना देखील १० जानेवारीनंतर बूस्टर डोसचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा प्रधानमंत्री मोदी यांनी केली.