पुणे -करोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही करोनाचा धोका कायम आहे. लसीकरण देखील व्यापक प्रमाणावर सुरू असल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
सिनेमागृह आणि नाट्यगृहांसोबतच दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना देखील परवानगी देण्यात आली आहे. उत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक असल्याने दिवाळी सणासाठी राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे.
राज्यातली धार्मिक स्थळे पुन्हा खुली करण्यात आली आहेत. मात्र, तरीदेखील दिपावलीचा उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील, याची दक्षता घेतली जावी. खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होत असते. मात्र, नागरिकांनी गर्दी टाळावी. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांनी बाहेर पडणे टाळावे.
मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि करोनाच्या इतर नियमांचं तंतोतंत पालन करावे. दीपावलीच्या उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. त्यामुळे वायू आणि ध्वनीप्रदूषणाची पातळी वाढून लोकांच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. करोना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या नागरिकांना फटाक्यांच्या धुरामुळे त्रास होण्याची भीती आहे.
त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडण्याचे टाळून दिव्यांची आरास करून उत्सव साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. दिवाळी पहाटसारख्या कार्यक्रमांना परवानगी देतानाच त्यासाठी आवश्यत ती नियमावली देण्यात आली आहे. या नियमावलीचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घेण्यात यावी.
शक्यतो असे कार्यक्रम ऑनलाइन, केबल नेटवर्क किंवा फेसबुक लाईव्ह अशा माध्यमातून करण्यात यावेत. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्यविषयक उपक्रम, रक्तदान शिबिरे आयोजित करून त्यातून करोना, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांचे प्रतिबंधात्मक उपाय आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करावी, असेही शासनाने म्हटले आहे.