वडूज -कलेढोण, ता. खटाव येथील बोबडे मळा शिवारात एका महिलेचा खून करून, तिच्या अंगावरचे सोन्याचांदीचे चोरून नेल्याप्रकरणी सचिन मच्छिंद्र शिरतोडे (वय 27, कलेढोण) यास येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
याबाबत माहिती अशी, कलेढोण हद्दीतील बोबडे मळा नावाच्या शिवारात सौ. शकुंतला बबन कणसे (वय 48, रा. कलेढोण) या 1 जून 2016 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास आपल्या गोठ्यातील जनावरांना चारापाणी देऊन जवळ असलेल्या मल्हारी नामदेव माळी यांच्या शेतात, लिंबाच्या झाडाखाली सावलीत झोपल्या होत्या.
त्यावेळी सचिन शिरतोडेने जबरी चोरीच्या उद्देशाने, वैरण तोडण्यासाठी असलेल्या कुऱ्हाडीने सौ. शकुंतला यांच्या उजव्या गालावर, कानाच्या जवळ घाव घालून त्यांचा खून केला होता. त्यानंतर त्यांच्या अंगावरील सोन्याचांदीचे दागिने चोरून नेले होते.
याप्रकरणी वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सपोनि रवींद्र गायकवाड यांनी केला होता. सचिन शिरतोडे याला अटक करून, त्याच्याकडून दागिने जप्त केले होते. गायकवाड यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध वडूज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
न्यायाधीश पी. वाय. काळे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. याकामी सहाय्यक जिल्हा सरकारी वकील वैभव काटकर यांनी काम पाहिले. यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने 13 साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांचे जबाब, पोलिसांनी दाखल केलेले पुरावे व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून काळे यांनी आरोपीला भादंवि कलम 302 अन्वये जन्मठेप व पाच हजार रुपये दंड, कलम 397 अन्वये सात वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास प्रत्येकी दोन महिने शिक्षा सुनावली. याकामी प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे हवालदार दत्तात्रय जाधव, दपिक शेडगे, महिला हवालदार दडस, पोलीस कॉन्स्टेबल सागर सजगणे व अक्षय शिंदे यांनी सहकार्य केले.