महाळुंगे इंगळे -सायबर गुन्हे दिवसागणित वाढत आहे. अशा सायबर गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने यंत्रणा विकसित केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने 155260 हा क्रमांक हेल्पलाइन म्हणून जारी केला आहे.
ज्यांचे पैसे खात्यातून उडाले असतील त्यांनी या क्रमांकावर कॉल करावा. जेवढ्या लवकर हेल्पलाइनवर कॉल कराल तेवढे गुन्हेगार शोधून काढण्यास आणि रक्कम परत मिळण्यास मदत होते.
इंटरनेटला कुठलीही भौगोलिक मर्यादा नसल्याने अगदी विदेशात बसलेला हॅकरही तुमच्या खात्यातील पैसे लंपास करू शकतो. अर्थात त्याला तुम्हीही मदत करीत असता ते ओटीपी सांगून, एखादे ऍप डाऊनलोड करून! हॅकर कितीही तरबेज असला तरी त्याला एकतर्फी हात साफ करताच येत नाही.
यंत्रणा काम कशी करते?
हेल्पलाइन क्रमांकावर कॉल येताच नाव, मोबाइल, खाते क्रमांक, पैसे वजा झाल्याची वेळ ही महत्त्वाची माहिती विचारली जाते. याकामी आरबीआयचेही सहकार्य मिळत आहे. क्राईम झाल्यानंतर पहिले दोन ते तीन तास महत्त्वपूर्ण असतात. आतापर्यंत अनेक नागरिकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत.
आठ मिनिटांत रक्कम होल्ड
सायबर गुन्हेगाराने चुना लावल्याचे कळताच त्वरित 155260 या क्रमांकावर कॉल केल्यास सायबर यंत्रणा कामाला लागते आणि अवघ्या सात ते आठ मिनिटांत ट्रान्सफर झालेली रक्कम होल्ड केली जाते.
कारण, गुन्हेगार पैसे चोरी करण्यासाठी अनेक खात्यांचा वापर करीत असतात. कॉल येताच संबंधित बॅंक अथवा ई-साइटला अलर्ट केले जाते. त्यामुळे ट्रान्सफर सुरू असतानाच पैसे होल्ड केले जातात.