पुणे, दि. 19 (विजयकुमार कुलकर्णी) – बेकायदा सावकारीचा फास आवळला गेल्याने अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्यामुळे शासनाने या विरोधात अनेक कडक धोरणे अमलात आणली. मात्र, आता या बेकायदा सावकारीने “ऑनलाइन लोन ऍप’ असा आधुनिक चेहरा धारण केला आहे. त्याद्वारे नागरिकांचे शोषण करण्यात येत आहे. पुणे सायबर पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात 2020 ते ऑगस्ट 2022 या सुमारे तीन वर्षांच्या कालावधीत ऑनलाइन लोन ऍपच्या माध्यमातून फसवणूक झाल्याच्या तब्बल 4 हजार 778 तक्रारी दाखल झाल्या आहेत. 2022 साली आठ महिन्यांच्या कालावधीत 3 हजार 151 तक्रारींची नोंद आहे.
ऑनलाइन लोन ऍपच्या माध्यमातून फसवणूक होण्याच्या घटनांमध्ये गेल्या तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सायबर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीकडून ऑनलाइन लोन ऍपच्या माध्यमातून 14 लाख रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडे तपास केला असता, त्यांचे ऑनलाइन लोन ऍपच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याची बाब उघड झाली. त्यांनी अनेकांच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती या गुन्हेगारी टोळीला पुरवल्याचेही तपासात उघड झाले होते.
मायक्रो फायनान्सच्या नावाखाली 15 दिवसांत कर्ज मंजूर करून देण्याचे गंडा घालणाऱ्या बंटी-बबलीला गुजराथ येथून अटक केली होती. अशा विविध घटना उघड झाल्या आहेत. एका प्रकरणात पैशासाठी नातीने आजीचा खून केला होता.
कसे ओढले जाते जाळ्यात?
सध्या “प्ले स्टोअर’वर तब्बल 600 बनावट ऑनलाइन लोन ऍप आहेत.
प्रथम हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर तुमच्या मोबाइलमधील सर्व गोपनीय माहिती चोरली जाते.
त्यानंतर या ऍपच्या माध्यमातून गरजू लोकांना आमिष दाखवून कर्ज घेण्यास भाग पाडले जाते.
घेतलेले कर्ज वेळेत भरले नाही, तर या ऍपकडून कर्जासाठी तगादा लावला जातो.
त्यानंतर तुमच्या मोबाइलमधील फोटो किंवा व्हिडीओ तुमच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती किंवा नातेवाईकांना पाठवून बदनामी केली जाते.
हे व्हिडीओ, फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी देऊन अधिक व्याजाने कर्जाची वसुली केली जाते.
अशा ऍपकडून महिलांना सर्वाधिक टार्गेट केले जात आहे.
फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल होण्याच्या भीतीने काही जण थेट आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही काही घटनांमधून समोर आले आहे.
प्ले स्टोअरवरून ऍप डाऊनलोड करताना काळजी घ्यावी. ऍप डाऊनलोड केल्यानंतर ऍपला सर्व परवानग्या देऊ नयेत. अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. ऑनलाइन कर्ज हे जीवाशी खेळ ठरू शकते. त्यामुळे असे कर्ज घेताना काळजी घ्यावी. बॅंकेशी निगडित माहिती शेअर करू नका. जर तुमची फसवणूक झाली असेल, तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधा.
– ऍड. जितेंद्र सावंत, फौजदारी वकील