तरुणांमध्ये वाढताहेत हाडांच्या व्याधी

पुणे, दि. 19 -हाडांचे बरेच रोग आता कमी वयात होऊ लागले आहेत. किंबहुना या रोगांनाच आता वयाचे बंधन राहिले नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यातला एक रोग म्हणजे “ऑस्टिओपोरोसिस’. 20 ऑक्टोबर हा दिवस “जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिवस’ म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या निमित्ताने या रोगाविषयी जागृती केली जाते.
सन 1996 मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला. या रोगात हाडे कमकुवत होतात, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. जसजसे वय वाढत जाते, तसतसे हाडे कमकुवत होऊ लागतात आणि ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता वाढते. तरुणांमध्ये किंवा प्रौढ वयात हा रोग होण्याला चुकीची जीवनशैली कारणीभूत असल्याचे निरीक्षणातून दिसून आले आहे.
“ऑस्टियोपोरोसिस’ ही हाडांशी संबंधित समस्या आहे. ज्यामध्ये हाडांना ताकद नसते. थोडीशी दुखापत किंवा हाडांना थोडा जोरात धक्का लागला तरी हाड तुटते. ही समस्या विशेषतः वृद्धावस्थेत दिसून येते. कंबरेची हाडे, पेशींच्या आजूबाजूची हाडे आणि नितंबाच्या हाडांना म्हणजे माकड हाडाला ऑस्टिओपोरोसिसचा सर्वाधिक फटका बसतो. आजाराची वरवर कोणतीच लक्षणे दिसत नाहीत, परंतु कंबरेच्या खालचा भाग आणि मानदुखीचा त्रास होण्याला सुरुवात होते. हिवाळ्यामध्ये हाडांचे दुखणे वाढते. पोषण आहार हा यावरचा मुख्य उपाय आहे. आहारात हिरव्या भाज्या, दूध, फळे, अंडी, मासे यांचा समावेश करावा.
स्टिरॉइडच्या अतिवापरामुळे महिलांमध्ये ऑस्टिओपोरोसिसच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. तणाव आणि त्यामुळे हार्मोनल असंतुलनामुळे हाडांची झीज किंवा ऑस्टिओपोरोसिस होऊ शकतो. सूर्य प्रकाशाचा अभाव आणि व्हिटॅमिन डी 3 आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडांचे नुकसान होऊ शकते.
-डॉ. प्रितिका शेट्टी, प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ज्ञ
तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस आहे, हे कळणार नाही जोपर्यंत तुम्हाला काही वेदना, फ्रॅक्चर होत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता, हार्मोनल असंतुलन, बैठी जीवनशैली, धूम्रपान, अल्कोहोलचे अतिसेवन हे या दुखण्याला कारणीभूत ठरतात.
-डॉ. नरेंद्र वैद्य, रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन





