पिंपरी -केबल्ससाठी बेकायदेशीरपणे रस्ते खोदाई प्रकरणात पुणे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात तब्बल 7 हजार 440 किलोमीटरचा घोटाळा उघडकीस आला आहे. त्यामधून दंडासह सुमारे 10 हजार 60 कोटी रुपयांचा महसूल महापालिकेला मिळणार आहे.
अशाच पद्धतीने पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बेकायदा केबल्स शोधून काढल्यास शहरातील टोळ्या व काही भ्रष्ट राजकारण्यांनी महापालिकेचा हजारो कोटी रुपयांचा महसूल बुडविल्याचा प्रकार समोर येऊ शकेल, असा दावा नगरसेविका सीमा सावळे यांनी केला आहे.
शहरामध्ये खोदाई केलेल्या संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करा. तसेच या कामासाठी त्रयस्थ संस्थेची नेमणूक करा, अशी मागणी सावळे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे, त्यानुसार, पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत शहरात मोठ्या प्रमाणात ओव्हरहेड केबल्स, अंडरग्राउंड टीव्ही केबल्स, इंटरनेट केबल्स, ब्रॉड बॅंड केबल्स बेकायदेशीर मार्गाने टाकण्यात आल्या आहेत.
अशा प्रकारे बेकायदेशीर केबल्स टाकल्यामुळे मनपाचा महसूल मोठ्या प्रमाणात बुडविला जातो तसेच बेकायदेशीरपणे खोदाई केल्यामुळे खडी शुल्क बुडविला जातो. रस्ते दुरुस्तीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.
पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बेकायदेशीरपणे टाकण्यात आलेल्या केबल्सचा शोध घेतल्यास पुणे मनपापेक्षा जास्त बेकायदेशीर केबल्स उघडकिस येतील व शहराचे विद्रुपीकरण देखील थांबेल. बेकायदेशीर रस्ते खोदाई करून केबल्स टाकून शहरातील गुंड टोळ्या व काही भ्रष्ट राजकारण्यांनी मनपाचा हजारो कोटी रुपयांचा महसूल बुडविला आहे.
स्मार्ट सिटीसाठी झालेल्या रस्ते खोदाई करताना देखील परस्परपणे इतर कंपन्यांच्या केबल्स देखील बेकायदेशीरपणे टाकण्यात आल्या आहेत. शहरात या बेकायदेशीर रस्ते खोदाई माफियाला जेरीस आणण्यासाठी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
त्यामुळे पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील बेकायदा केबल्स शोधून संबंधित कंपन्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी स्वतंत्र संस्थेची नेमणूक करावी अशी मागणी नगरसेविका सीमा सावळे यांनी केली आहे.