FIFA World Cup Qualifiers 2026 – फिफा विश्वकरंडक (२०२६) व एएफसी आशियाई करंडक (२०२७) या दोन्ही महत्त्वाच्या स्पर्धांच्या पात्रता फेरीतील अफगाणिस्तानविरुद्धच्या लढतींसाठी भारतीय फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली. भारताच्या संभाव्य ३५ खेळाडूंच्या नावांची यादी जाहीर करण्यात आली असून मध्य बचावफळीतील खेळाडू अन्वर अली व बचावफळीतील खेळाडू जिक्सन सिंग यांचे पुनरागमन झाले आहे.
मोहन बागानचा स्टार खेळाडू अन्वर अली घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे गेल्या मोसमात मैदानात उतरु शखला नव्हता. जानेवारी महिन्यातील आशियाई करंडकातही तो खेळू शकला नाही. तसेच गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात डाव्या खांद्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे जिक्सन सिंगही संघातून बाहेरच होता.
फिफा विश्वकरंडकाच्या पात्रता फेरीत भारतीय फुटबॉल संघाचा अ गटात समावेश आहे. या गटात भारतासह कतार, कुवेत व अफगाणिस्तानचा समावेश आहे. साखळी फेरीत प्रत्येक संघ उर्वरित तीन देशांशी दोन वेळा लढणार आहेत. भारतीय संघाने कुवेतला पराभूत केले असून कतारकडून मात्र त्यांना हार पत्करावी लागली आहे.
आता २१ ते २६ मार्च या दरम्यान भारतीय संघ अफगाणिस्तानशी दोन वेळा खेळणार आहे. २१ मार्च रोजी सौदी अरेबियामध्ये अफगाणिस्तानशी सामना खेळल्यावर २६ मार्च रोजी गुवाहाटी येथे भारतीय संघ त्यांना टक्कर देणार आहे. साखळी फेरीत दमदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाकडे तिसऱ्या फेरीत पोहोचून इतिहास रचण्याची संधी असणार आहे.
संभाव्य संघ :
गोलरक्षक : गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, फुर्बा तेम्पा लाचेंपा, विशाल केथ.
बचावपटू : आकाश मिश्रा, लालचुंगनुंगा, मेहताब सिंग, प्रितम कोटाल, राहुल भेके, निखिल चंद्रशेखर पुजारी, सुभाशिष बोस, नरेंदर, अन्वर अली, रोशन सिंग, अमेय गणेश रानावडे, जय गुप्ता.
मधली फळी : अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नांडिस, लिस्टन कोलॅको, महेश सिंग, शाहल अब्दुल सामद, सुरेश सिंग, जिक्सन सिंग, दीपक तांगडी, एल. ख्वालरिंग, एल. राल्टे, इमरान खान.
आक्रमक फळी : सुनील छेत्री, इशान पंडिता, एल. छांगटे, मानवीर सिंग, विक्रम प्रताप सिंग, राहुल प्रवीण, नंदकुमार सेकर.