नवी दिल्ली – कोरोना विषाणूच्या दुसर्या लाटेमुळे देशातील संपूर्ण यंत्रणा हादरलीय. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचे जीवन धोक्यात आलेय. अशा परिस्थितीत सरकारसह अनेक कंपन्याही त्यांच्या वतीने शक्य तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासंदर्भात इफ्को (IFFCO) ही प्रसिद्ध खत कंपनीही पुढे आलीय. कंपनी देशात ऑक्सिजनच्या चार प्रकल्पांची निर्मिती करत आहे. 30 मेपासून तिसऱ्या प्लांटचे काम सुरू होईल.
त्याद्वारे रुग्णालयांमध्ये मोफत ऑक्सिजनचा पुरवठा केला जाईल, ज्यामुळे लोकांचे प्राण वाचविण्यात मदत होईल. उत्तर प्रदेशातील फुलपूरमध्ये हा प्लांट स्थापित केला जात आहे. याखेरीज देशाच्या इतर भागातही प्लांट उभारण्यात येत आहेत. कंपनी या प्रकल्पासाठी सुमारे 30 कोटी रुपये खर्च करीत आहे. कंपनीच्या या पुढाकाराने लाखो लोकांना आशेचा नवा किरण मिळणार आहे.
इफ्को यूपीमधील फुलपूर येथे एक-एक प्लांटची निर्मिती करीत आहे. तसेच बरेलीतील आमला, ओडिशामधील पारादीप आणि गुजरातमधील कलोल येथेही हे प्लांट बसवले जाणार आहेत. प्लांटमध्ये तयार होणारा ऑक्सिजन आसपासच्या भागातील रुग्णालयांना विनामूल्य पुरविला जाणार आहे.
उत्तर प्रदेशातील फुलपूर येथे सुरू होणाऱ्या या प्रकल्पासंदर्भात इफ्कोचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यूएस अवस्थी यांनी ट्विट केले की, या संयंत्रांची क्षमता ताशी 130 घनमीटर असेल. सहकारी संस्थेने फूलपूर युनिटमध्ये तिसरा ऑक्सिजन प्लांट बसविण्याचा आदेश दिलाय. 30 मे रोजी ऑपरेशन सुरू केले जाईल. याशिवाय ओडिशाच्या पारादीप युनिटमधील चौथ्या ऑक्सिजन प्लांटमध्येही काम केले जात आहे.