जळोची – कालच एक डेटा आला आहे. ईडी आणि सीबीआय मध्ये 95% केसेस, आणि ज्यांना अटक झालेली आहे.. ती विरोधी पक्षातील नेत्यांनाच झालेली आहे असा सरकारचा डेटा सांगतो. त्यामुळे काल अरविंद केजरीवालांची अटक झाली ती दुर्दैवी आहे. हा लोकशाहीचा खून आहे. लोकशाहीचा खून या देशात रोज होत आहे. कारण स्वातंत्र्य राहिलंच नाही. जो विरोधात बोलतो त्याच्यावर कोणती ना कोणती कारवाई होते. विरोधी पक्षातील नेत्यांवर ज्या पद्धतीने ईडी आणि सीबीआयच्या केसेस होत आहेत. ज्यांच्यावर आरोप झालेत त्यांना भाजपात प्रवेश देऊन क्लीन चीट दिली जाते, असे काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत अनेक उदाहरणे देता येतील.. अशी अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज बारामती दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार करत असताना अजित पवार गटाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घालत जाब विचारला.. ही बाब सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाली. याची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे ग्रामीण पोलिसात रीतसर पत्र देत युगेंद्र पवार व रोहित पवार यांना सुरक्षा मिळावी या आशयाचे पत्र पोलिसांना दिले आहे.
याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारला असता सुळे म्हणाल्या की, लोकशाही मार्गाने शांततेत युगेंद्र पवार, रोहित पवार असे अनेक जण संघटनेतील कुटुंबातील सहकारी प्रचार करत आहेत. आम्ही कोणताही नियम तोडला नाही आणि तोडणार नाही ही आमची संस्कृती आहे. मात्र ज्या पद्धतीने युगेंद्र आणि रोहित यांच्यावर अटॅक होत आहे. हे दुर्दैवी आहे. याबाबत वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांनी मला विचारले. लोकशाहीच्या मार्गाने प्रत्येकाला या देशात प्रचार करण्याचा अधिकार आहे.
माझा रस्ता आडवा, मला घेराव –
योगेंद्र हा पहिल्यांदाच माझा प्रचार करत आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये तो परदेशी शिक्षणासाठी होता. वारंवार तो प्रचाराला बाहेर पडल्यावर संविधानाच्या चौकटीत राहून व शांततेच्या मार्गाने तो प्रचार करत आहे. युगेंद्र दरवेळी प्रचार करताना त्यालाच कसा घेराव घातला जातो. त्याला जाब विचारला जातो ? असा प्रश्न करून खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जाब विचारायचाच असेल तर मला विचारा. निवडणूक मी लढत आहे. माझा रस्ता आडवा. मला घेराव घाला. मला काही अडचण नाही. मी उत्तर देण्याला सक्षम आहे. आमच्या घरातील मुलांवर ज्या पद्धतीने घेराव घातला जातो व असे काही प्रकार होत आहेत हे दुर्दैव आहे. याची मला काळजी वाटते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.