सध्या देशात कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या 606वर पोहोचली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सायंकाळी सांगितले. त्यात 43 परराष्ट्रीय नागरिकांचा समावेश आहे. देशात मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे. योगायोगाने देशात 21 दिवस लॉकडाऊनची सुरवात बुधवारीच झाली. याच पार्श्वभूमीवर खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होम म्हणजे घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे.
दरम्यानमी घरातून काम करत असतांना अनेकदा आपण आपल्या सोयीनुसार कसंही बसून काम करतो, शिवाय अशा अनेक चुका करतो ज्यामुळे शारीरिक वेदना उद्बवतात. विशेषत: पाठदुखी आणि कंबरदुखी. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमची शारीरिक स्थिती. घरी असल्यावर अनेक जण बेडवर झोपून किंवा आडवं पडून काम करत असाल तर त्यामुळे कमरेत वेदना होतील. बसण्यासाठी योग्य उंचीचं टेबल आणि खुर्चीची व्यवस्था करावी. अगदी कमी किंवा अगदी जास्त उंचीची खुर्ची टेबलामुळेदेखील पाठीच्या समस्या उद्बवतील.
ऑफिसमध्ये असताना आपण छोट्या छोट्या कामांसाठी, जेवणाठी, चहा पिण्यासाठी एका जागेवरून उठतो, हालचाल करतो. मात्र घरी शरीराची अशी हालचाल होत नाही. त्यामुळे प्रत्येकी 30 मिनिटांनी 3 मिनिटांचा ब्रेक घ्यायला हवा. खुर्चीवरून उठून आजूबाजूला थोडं चाला, शरीर स्ट्रेच करा. बहुतेक लोकं ऑफिसमध्ये भरपूर पाणी पितात मात्र घरी तितकं पाणी पित नाही.
पाणी कमी प्यायल्यानंदेखील डोकेदुखी, कंबरदुखी, पाठदुखीची समस्या उद्भवते. त्यामुळे घरातून काम करताना सोबत पाण्याची बाटली ठेवा. पाणी पित राहा. यामुळे ऊर्जाही मिळते. घरात असताना आपली शारीरिक हालचाल होत नाही. त्यामुळे किमान 30 मिनिटं तरी व्यायाम करायला हवा. यामुळे हाडंही निरोगी राहतील आणि शारीरिक वेदना बळावणार नाहीत.