वेल्हे – पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या वेल्हे तालुक्याला बाहेरून नव्याने येणाऱ्या व्यक्तीपासून करोना संपर्काचा जास्त धोका आहे. तालुक्यात एकूण 18 रुग्ण आहेत, तर या आधी पानशेत परिसरासह 8 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. या सर्वांचा इतिहास पाहिला तर त्यांचा रेड झोन असलेल्या पुण्याशी संपर्क आला आहे.
वेल्हे तालुक्याला पुणे जवळ असल्याने नोकरीनिमित्त व इतर कामांसाठी तालुक्यातील नागरिक सातत्याने पुण्याकडे ये-जा करीत आहेत. लॉकडाऊन शिथील झाले आहे, तसेच आपल्या गावी जाण्यासाठी परवानगी मिळत असल्याने वेल्हे तालुक्यात पुणे-मुंबईवरून येणारा नागरिकांचा लोंढा वाढत आहे, यामुळे करोना मोठ्या प्रमाणावर हात-पाय पसरण्याची शक्यता आहे. यासाठी वेल्हे प्रशासनाकडून काही खबरदारी घेण्यात येत आहेत.
वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजी शिंदे यांनी बाहेरून तालुक्यात येणाऱ्यांना गावात जाऊ न देता नेमून दिलेल्या ठिकाणी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाइन करण्याचे आदेश दिले आहेत. तालुक्यातील चार मंडल विभागाच्या ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाइनची चार ठिकाणे नेमली आहेत, त्यामुळे आता पुणे-मुंबईवरून येणाऱ्यांना आपल्या गावात जाता येणार नाही, तर थेट संस्थात्मक क्वारंटाइन व्हावे लागणार आहे.
क्वारंटाइन होणाऱ्यांच्या आरोग्यावर 14 दिवस विषेश लक्ष दिले जाणार असून, त्यांच्या आरोग्याची दिवसातून दोनदा तपासणी केली जाणार आहे. क्वारंटाइन लोकांच्या जेवणाची व इतर सर्व सोयी क्वारंटाइन झालेल्या ठिकाणीच मिळणार आहे.
क्वारंटाइनची ठिकाणे :
सरस्वती विद्यालय, अंबवणे लक्ष्मी मंगल गार्डन कार्यालय, कोंढावळे बुद्रुक न्यू इंग्लिश स्कूल, विंझर वीर बाजी पासलकर हायस्कूल, पानशेत.