शिक्षणमंत्री वाघानी यांचे वक्तव्य
अहमदाबाद –आम आदमी पक्षाला (आप) प्रत्युत्तर देण्याच्या नादात गुजरातचे शिक्षणमंत्री जितू वाघानी यांनी बुधवारी अजब वकव्य केले. गुजरातमधील शालेय शिक्षण रुचत नसेल तर आवडणाऱ्या राज्यात किंवा देशात जा, असे त्यांनी म्हटले.
आप आणि भाजपच्या नेत्यांमध्ये दिल्ली आणि गुजरातमधील शिक्षण व्यवस्थेवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याचा संदर्भ घेऊन वाघानी यांनी शाळा इमारतीच्या उद्घाटनावेळी आप समर्थकांवर निशाणा साधला. काही लोक गुजरातमध्ये जन्मतात आणि वाढतात. त्यांची मुले येथेच शिकतात.
तरीही त्यांना शालेय शिक्षणाच्या दृष्टीने इतर राज्ये चांगली वाटतात. त्यांना मी विनंती करतो की, त्यांनी मुलांचे शाळा सोडल्याचे दाखले घेऊन इतरत्र जावे.
इथले सगळेच काही वाईट असल्याची मानसिकता बाळगणाऱ्यांनी इथे एक क्षणही थांबू नये, असे वाघानी म्हणाले. आता वाघानी यांच्या वक्तव्यामुळे विरोधकांना भाजपच्या सरकारवर टीकेची आयतीच संधी मिळाली आहे.